सीमेवरील जवानांना पुणेकरांकडून राख्या
पुणे : रक्षाबंधनाचा सण म्हणजे बंधुत्व, प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याचे प्रतीक. हे नाते केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता, देशाच्या रक्षणासाठी सीमारेषेवर उभ्या असलेल्या जवानांशीही घट्ट बंध निर्माण करते. भारतीयांचे खऱ्या अर्थाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना दरवर्षीप्रमाणे ‘सैनिक मित्र परिवार’ आणि सहयोगी संस्थांनी रक्षणाच्या प्रतीक असलेल्या राख्या पाठविण्यात आल्या.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे करण्यात आले होते. खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु कवयित्री प्रतिभा मोडक, ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता भिडे चापेकर, क्रीडा प्रशिक्षक प्राची वाईकर, वीरपत्नी दीपाली मोरे, कल्याणी सराफ यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. या राख्या टपालाने सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. यावेळी सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार, युवराज गाडवे, राजेंद्र बलकवडे, ॲड. रजनी उकरंडे, महेंद्र पिसाळ, गिरीश पोटफोडे उपस्थित होते. सैनिकांसाठी शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे आणि शुभेच्छा संदेश देखील पाठवण्यात आले.
ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये आजच्या काळात अंतर नाही. बहिण भावाप्रमाणे बहिणी बहिणी देखील रक्षाबंधन साजरे करतात कारण एकमेकांचे रक्षण आपण करतो. उणे तापमानात आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवण्याचे भाग्य आपल्याला मिळते आहे, हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अमूल्य आहे.
प्रतिभा मोडक म्हणाल्या, नव्या पिढीपर्यंत देश धर्माचे कार्य रुजवण्यासाठी असे उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे.
आनंद सराफ म्हणाले, सीमेवरील जवानांना या राख्या पाठवल्या जातात. भारतीय सण हे नाती दृढ करणारे आहेत. देशाच्या सीमा भागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये राख्या पाठवल्या जातात. राख्या पोहोचल्यावर देवतांसमोर पूजन करून सैनिकांच्या पोलादी मनगटावर राखी बांधली जाते. सन १९९८ पासून सरहद्दीवरील सैनिकांना राख्या पाठवल्या जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पुण्यातील सैनिक पुनर्वसन केंद्रात देखील प्रत्यक्ष रक्षाबंधन साजरे केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, सीमेवर रक्षण करणाऱ्या खऱ्या भावांना लाडक्या बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत. तब्बल १ लाखाहून अधिक राख्या कारगिल विजय दिनी पाठवण्यात येत आहेत.
