विश्व मानवतेचा अस्मिताकर्षण आवाज म्हणजे अब्दूल कलाम – श्रीपाल सबनीस यांचे मत
पुणे ः महापुरुष कधीही देशधर्माशी सीमित नसतात. त्यांना जात-धर्माचे बंधन नसते. ते सर्व लोकांचे, सर्व देशांचे महापुरुष असतात. डॉ. अब्दुल कलाम हे नेहमीच ‘विश्वधर्म’ मानणारे होते. भारतीय आणि विश्वात्मक अशा सर्व प्रवाहांचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येते. विश्व मानवतेचा अस्मिताकर्षणआवाज म्हणजे अब्दुल कलाम, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
विजय चव्हाण लिखीत डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची स्मृतिफुले ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील जिजामाता हायस्कूल येथे करण्यात आले. यावेळी नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकिल, पिंपरी चिंचवड मसापचे अध्यक्ष राजन लाखे, अभियंता कमलकांत वडेलकर, लेखक विजय चव्हाण, प्रकाशक नितिन हिरवे, वीर शिवराय मंडळाचे किरण सोनिवाल, निलेश वरघन्टे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, शिक्षक मनीषा चव्हाण, भाग्यश्री गायके, संगीता खताळ उपस्थित होते.
राजन लाखे म्हणाले, एखादी व्यक्ती जेव्हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून, पुढे जात असते तेव्हा ती ध्येयाने झपाटलेली असते. अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न ते नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत. असे ध्येयवेडे होण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी महत्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.
लीना बोकिल म्हणाल्या, अनेक मोठ्या व्यक्तींमध्ये मला एक समान गोष्ट जाणवते ती म्हणजे विनम्रता. तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्यात विनम्रभाव नेहमी जपला गेला पाहिजे. विद्यार्थिदशेपासूनच तुम्ही स्वप्न बघायला सुरुवात केली पाहिजे. कारण स्वप्न पाहिली तरच त्याच्या पूर्णत्वाचा ध्यास लागतो , असेही त्यांनी सांगितले. विजय चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनिकेत यादव यांनी सूत्रसंचालन केले. विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. किरण सोनीवाल यांनी आभार मानले.
