Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पारंपरिक वाद्यांवर यावर्षी खटले होणार नाहीत – पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा

 

पुणे : तरुणाईची मोठी संख्या पुण्यातील ढोल ताशा पथकांमध्ये आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पथके पाहिली, पण पुण्यासारखी ढोल ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत. तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले होणार नाहीत. मागील वर्षी लेझर लाईट बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो, यावर्षी त्याप्रमाणे डीजे चे करता आले तर प्रयत्न करुया, असे मत पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कसबा गणपती मंदिराचे मुख्य विश्वस्त विनायक ठकार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. महासंघाचे अ‍ॅड.शिरीष थिटे, विलास शिगवण, अक्षय बलकवडे , अमर भालेराव, ओंकार कलढोणकर आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रमुख व विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, जेव्हा ढोल ताशा पथके सराव करतात. तेव्हा रात्री १० नंतर पोलीस मुख्यालयात तक्रारींचे सर्वाधिक दूरध्वनी येतात. त्यामुळे सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरु करुन रात्री १० पूर्वी बंद करणे गरजेचे आहे. आज आपल्या पारंपरिक गोष्टी जागतिक स्तरावर जात आहेत. ढोल ताशा देखील जागतिक स्तरावर पोहोचला असून पुण्यातील २७ हजार वादकांच्या शक्तीचा उपयोग उत्सवकाळात कसा करता येईल, हे देखील पाहू.

कृषिकेश रावले म्हणाले, ढोल ताशा पथकातील वादकांचा वादन करताना आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हावा, हा उद्देश नसतो. पुण्याच्या गणेशोत्सवात पोलिसांचे काम अवघड आहे, असे मी वरिष्ठांकडून ऐकले आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अडचण न येता, हा उत्सव आपण साजरा करु. याकरिता लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

महेश सूर्यवंशी म्हणाले, ढोल ताशा वादनाने सर्वांमध्ये चैतन्य निर्माण होते. मर्यादेपेक्षा आवाज वाढल्याने खटले भरले जातात. मात्र, जी मर्यादा आहे, तेवढा आवाज निर्मिती करणारे वाद्य निर्मिती केल्यास कार्यकर्त्यांवर खटले होणार नाहीत. तसेच उत्सवकाळात शहराच्या पूर्व भागात कमी प्रमाणात गर्दी होते. याकरिता पूर्व भागात ढोल ताशा वादन, रंगावली प्रदर्शन असे उपक्रम व्हायला हवेत.

पराग ठाकूर म्हणाले, अमेरिका, आॅस्टेÑलिया, कॅनडा अशी परदेशात अनेक ठिकाणी पुण्याची ढोल ताशा संस्कृती पोहोचली आहे. महाराष्ट्राची ढोल ताशा ही ओळख आहे. डिजे मुक्त उत्सव साजरा करायचा असेल, तर सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. त्याकरिता पथकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे बरची पथक, टिपरी, घुंगुरकाठी पथक सहभागी करुन घ्यायला हवे. यामुळे मुलांना देखील आनंद घेता येईल. गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव आहे, केवळ शेवटच्या दिवसापुरता तो मर्यादित राहता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading