Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

‘अर्का फिनकॅप’ने सादर केला कर्जासाठीचा प्लॅटफॉर्म ‘आपका अपना’

मुंबई : अर्का फिनकॅप लिमिटेड या किर्लोस्कर समूहातील वित्तीय कंपनीने सुरक्षित किरकोळ कर्जे वितरीत करण्यासाठी ‘आपका अपना’ या नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील मध्यम व लहान शहरांतील लघु उद्योजकांपर्यंत कर्जांची सुविधा पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत व्यवसायांसाठी तारण कर्जे, तसेच वापरलेली वाहने खरेदी करण्यासाठीदेखील कर्जे दिली जातील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या, स्वयंरोजगारात गुंतलेल्या, परंतु पारंपरिक बँकिंग व्यवस्थेपासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना हा प्लॅटफॉर्म आधार देईल.

‘आपका अपना’च्या रुपाने ‘अर्का फिनकॅप’ने आपल्या ब्रॅंडची नव्याने ओळख सादर केली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याच्या आणि त्यांच्याशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्याच्या कटिबद्धतेचे हे एक प्रतीक आहे. यापुढेही पारदर्शक, संवेदनशील आणि स्थानिक व्यवसायांच्या गरजांना समजून घेत कर्जपुरवठा करण्याच्या पद्धतीवर अर्का फिनकॅप भर देत राहणार आहे.

‘अर्का फिनकॅप लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक सम्राट गुप्ता म्हणाले, “आपका अपना’च्या माध्यमातून आम्ही केवळ व्यवसायिक कर्ज देत नाही; तर ग्राहकांना एक विश्वास देत आहोत. विश्वास, तंत्रज्ञान आणि सहवेदना यांच्या आधारे चालणारी एक सशक्त कर्जसंस्कृती घडवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत.”

‘आपका अपना’मधील नवीन कर्जयोजना ग्राहकांना सुलभ आर्थिक मदत देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. पात्र ग्राहकांना २४ तासांत कर्ज वितरण, कर्जाची आगाऊ परतफेड करून व्याजाची बचत करण्याची मुभा आणि व्यक्तिगत सहाय्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरची नियुक्ती अशा सोयी यामध्ये उपलब्ध असतील. ‘अर्का फिनकॅप’च्या कर्ज धोरणांमध्ये स्थानिक भौगोलिक आणि आर्थिक वैशिष्ट्यांचा विचार करून त्या अधिक सानुकूलित करण्यात आल्या आहेत. शिवाय, वेळेवर परतफेड करणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनात्मक बक्षिसांद्वारे चांगली कर्ज-शिस्त राखण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

‘अर्का फिनकॅप लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बंग म्हणाले, “आम्ही ३-३-३ अशी एक धोरणरचना आखली आहे. एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) तिपटीने वाढवणे, मालमत्तांमधून परतावा (आरओए) ३ टक्क्यांवर आणणे आणि थकीत कर्जांचे प्रमाण २०२९-३० या आर्थिक वर्षापर्यंत ३ टक्क्यांपेक्षा कमी करणे यांचा या रचनेत समावेश आहे. हे आमचे केवळ विकासाचे उद्दिष्ट नाही, तर शाश्वत आणि समावेशक प्रभावासाठीचा हा आराखडा आहे. आम्ही बळकट प्रशासन, माहिती-आधारित कर्जनिर्णय आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांद्वारे नव्या पिढीचा रिटेल कर्जांसाठीचा प्लॅटफॉर्म उभारत आहोत.”

‘अर्का फिनकॅप’चे सुरक्षित रिटेल कर्ज विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी परमिंदर मुल्तानी म्हणाले, “केवळ आर्थिक उत्पादने पुरवणे हा आमचा उद्देश नाही, तर खऱ्या जगातील व्यावसायिक अडचणी सोडवणे हा मूळ उद्देश आहे. आमची पद्धत ही गती, वैयक्तिकरण आणि उपयुक्तता या गोष्टींचे समतोल साधते. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर यशस्वी होण्याची संधी मिळते.”

‘अर्का फिनकॅप’च्या रिटेल कर्ज व्यवहारांना एका महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेचा आधार लाभलेला आहे. २०२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त शाखा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. २०२६ या आर्थिक वर्षात शाखांची ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पारंपरिक बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या भागांमध्ये ‘अर्का फिनकॅप’ची उपस्थिती अधिक मजबूत होईल आणि समावेशक आर्थिक विकासावर असलेला तिचा भर अधिक ठळकपणे जाणवेल.

या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून अर्का फिनकॅप आपल्या रिटेल कर्ज प्रवासाच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. तंत्रज्ञान, विश्वास आणि स्थानिक भौगोलिक माहिती यांचे संयोजन करून भारतातील लघु उद्योगांच्या आकांक्षांना हा उपक्रम बळ देईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading