Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

कला क्षेत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव

पुणे  : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘हिंदू महिला सभे’ची तब्बल ९० वर्षांची देदीप्यमान वाटचाल दृकश्राव्य माध्यमातून रसिकांसमोर शुक्रवारी सायंकाळी उलगडली आणि हाऊसफुल्ल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाने एक स्मरणरम्य सफर अनुभवली. जोडीला प्रसिद्ध वादक आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू यांनी अष्टपैलू वाद्य असलेल्या हार्मोनियम अर्थात संवादिनी या वाद्याचा सांगीतिक प्रवास ‘जादूची पेटी’ या मैफलीतून उलगडला. निमित्त होते पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमाचे. हिंदू महिला सभेच्या कार्याला ९० वर्षे पूर्ण झाली. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या नवरात्र महोत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षाचेही औचित्य या कार्यक्रमाला होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.

यावेळी कला क्षेत्रासाठी कायम मदतीचा हात पुढे करत कला क्षेत्रासाठी भरीव योगदान देणाऱ्या तसेच हिंदू महिला सभेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवणाऱ्या व्यक्तींना हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यामध्ये नाट्यसृष्टी मध्ये कार्यरत असणाऱ्या शुभांगी दामले व समीर हंपी, जनसंपर्क सल्लागार तुषार जोशी व प्रकाशन व जाहिरात क्षेत्रातील शिरीष अत्रे यांच्या समावेश होता. स्मृतीचिन्ह व भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना सुप्रिया दामले म्हणाल्या, ” नवरात्र महोत्सवा’चे अधिष्ठान धार्मिक असले तरी हिंदू महिला सभेच्या कार्यकर्त्यांनी हे अधिष्ठान जपून या उत्सवात मिसळलेले सांस्कृतिक रंग पुणेकरांना भावले. काळानुरूप संस्थेमध्ये नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रिया सहभागी होत गेल्या व त्यांनी बदलत्या काळाला प्रतिसाद देत, संस्थेची मूळ प्रेरणा कायम ठेवत कार्याला नवे आयाम दिले. सतत जपलेला एकोपा आणि कामातील पारदर्शकता, सकारात्मकता व उत्साह हे हिंदू महिला सभेच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. येत्या काळात देखील समाजाला प्रेरणादायी ठरतील अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरु राहील.”

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध संवादिनीवादक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांनी हार्मोनियम या वाद्याचा सांगीतिक प्रवास सांगणारी ‘जादूची पेटी’ उघडली. फ्रान्समध्ये झालेल्या हार्मोनियमच्या जन्मापासून, भारतातील या वादयाच्या प्रवेशापर्यंत, सारी वाटचाल त्यांनी संवादरूपाने कथन केली. शास्त्रीय, उपशास्त्रीय, चित्रपटसंगीत, भावसंगीत, पाश्चात्य संगीत, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत, सिंफनी आणि लोकसंगीत, असे सारे रंग हार्मोनिअममधून कसे व्यक्त होतात, याचा प्रत्यय या मैफिलीतून रसिकांनी घेतला. या कलाकारांना प्रसाद पाध्ये (तबला) आणि  प्रभाकर मोसमकर  (तालवाद्य) यांनी पूरक साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना जोगळेकर यांनी केले.

Leave a Reply