तरुणांमध्ये कठीण प्रसंगात लढण्याचे सामर्थ्य हवे – माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे
पुणे : परिस्थिती कितीही बिकट आली तरी तरुण मंडळींनी त्यापासून पळून न जाता त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य ठेवायला हवे, असा उपयुक्त सल्ला माजी सनदी अधिकारी भा. ई नगराळे यांनी आपल्या संघर्ष या आत्मकथनातून तरुणांना दिला आहे, त्यांनी सांगीतलेले हे खरे तत्त्वज्ञान युवा पिढीला निश्चितपणे उपयुक्त ठरणार असल्याचे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.
माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे यांनी लिहिलेल्या “संघर्ष” या आत्मकथनाचे प्रकाशन शनिवारी २४ मे रोजी पाषाण रस्त्यावरील सेंटर फॉर पोलीस रिसर्चच्या सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, माजी सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले तर डॉ. सोनिया नगराळे यांनी आभार मानले.
आपल्या संघर्ष या आत्मकथनातून भा. ई. नगराळे यांनी आपल्या आयुष्याचा पट उलगडून सांगताना त्यांनी केलेल्या संघर्षाची कहाणी मांडली आहे. तरुण पिढीसाठी ती प्रेरणादायी ठरणारी आहे. जातीची लक्तरे बाहेर दाखवली नाहीत तर समाजाला ती समजणार कशी? असा प्रश्न उपस्थित करून शिंदे म्हणाले की भा. ई . नगराळे यांनी या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला आपला प्रवास नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील समाजातील चित्र म्हणावे तसे बदलेले नाही त्यामुळे ते बदलण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी हा माणूस वादळात फडफडता दिवा घेऊन निघाला आहे, काही झाले तरी त्याला तो विझू द्यायचा नाही, हेच ध्येय घेऊन त्यांना नवीन पिढी घडवायची आहे. समाज हा आणखी सुधारायला हवा ही भूमिका घेऊन नगराळे आजही देत असलेल्या लढ्याचे कौतुकच आहे. नगराळे यांनी क्रांती घडवण्याचे काम हाती घेतलेले आहे त्यामुळे त्यांचा संघर्ष हा साधा नसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
बहुजन समाजातून अधिकार पदावर गेलेल्या अधिकाऱ्यांनी सरकारला लोकाभिमुख करण्याचे काम केले. त्याआधी सरकारने प्रशासनाचे सरकारीकरण करण्याचे काम केले होते. भा. ई नगराळे यांनी लिहिलेले आत्मकथन हे त्यांच्या आंतरिक उर्मीमधून आले आहे. त्यांचा संघर्ष हा नवे काहीतरी सांगणारा असून जगण्याचे आत्मभान देणारा असल्याचे डॉ. रावसाहेब कसबे यावेळी म्हणाले.
भा. ई. नगराळे आणि मी ४२ वर्षांपासून मित्र आहोत. जीवनात त्यांनी कृतज्ञता आणि निस्वार्थी सेवा यांना कायम महत्व दिले आहे, आजही त्यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टी कायम आहेत. त्यांचे आत्मकथन वाचताना डोळे पाणावले होते, अशी भावना राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण ज्या समाजातून येतो, तिथे घडत असताना दिलेल्या संघर्षाचा एक डॉक्युमेंटेशन व्हावे. नवीन पिढीला त्यामधून त्याची माहिती व्हावी. कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला जिंकायचेच आहे, हा सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशातून संघर्ष हे आत्मकथन लिहिले असल्याची भावना भा. ई. नगराळे यांनी यावेळी व्यक्त केली.
