Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पं. उल्हास कशाळकर आणि श्रुती विश्वकर्मा यांचे रंगतदार गायन

पुणे : ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांचा विलक्षण रंगलेली रागत्रयी आणि युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांचा दमदार राग मधुवंती, याद्वारा रसिकांनी शुक्रवारी एक श्रुतीमधुर मैफल अनुभवली.

ज्येष्ठ गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून श्रीकांत देशपांडे मित्रमंडळाच्या वतीने संगीतसंध्या या विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील वसंत पाटकर प्रतिष्ठानचे सहकार्य या कार्यक्रमासाठी मिळाले होते. श्रीकांतजी आणि ज्येष्ठ हार्मोनिअमवादक पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे विशेष स्नेहबंध होते. पं. जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे स्मरण ठेवत ही संगीतसंध्या पं. जळगावकर यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आली. या उपक्रमाचे हे १४ वर्ष होते. मैफिलीसाठी रसिकांना मुक्त प्रवेश होता.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या मैफिलीत सुरवातीला युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांनी राग मधुवंती सादर केला. ‘तोरे गुन गाऊ’ हा विलंबित त्रितालातील पारंपरिक ख्याल, मध्यलय त्रितालातील ‘काहे मान करो’ आणि आडाचौतालात निबद्ध तराणा त्यांनी पेश केला. गुरू बसवेश्वर यांच्या झपतालात बांधलेल्या कानडी दासवचनाचे सादरीकरण करत त्यांनी विराम घेतला. उत्तम दमसास, सुरेलता, शिस्तबद्ध सादरीकरण यामुळे श्रुती यांनी रसिकांची दाद मिळवली.
मनोगत व्यक्त करताना श्रुती म्हणाल्या,”मला या मैफिलीत गाण्यासाठी बोलावले हा मोठा सन्मान समजते. माझ्या गायनाचा श्रीगणेशा किराणा घराण्यापासूनच झाला. या परंपरेची सेवा करण्याची ही एक संधी मी समजते. मधुवंती हा स्वतः पं. श्रीकांत देशपांडे यांचाही आवडता राग होता, असे समजले. त्यामुळे हाच राग सादर केला.
त्यांना भरत कामत (तबला), उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनिअम) तसेच अधीश्री पोटे आणि तेजल कुलकर्णी (तानपुरा) यांनी अनुरूप साथसंगत केली.

मैफिलीच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी सिद्धहस्त गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. कामोद रागात ‘मती मालनिया ‘ हा झुमरा तालातील पारंपरिक ख्याल आणि त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘जाने ना दूंगी’ ही रचना त्यांनी ऐकवली. पाठोपाठ सोहनी पंचम रागात पं. दिनकर कायकिणी रचित ‘लंगर तोरे’ ही बंदिश त्यांनी प्रस्तुत केली. ज्येष्ठ गायक मा. कृष्णराव यांनी रचलेल्या ‘शिवकल्याण’ रागातील रूपक तालातील ‘माई प्रीतम करो’ ही बंदिश पेश करत पं. कशाळकर यांनी या विलक्षण रंगलेल्या संगीत संध्येची सुरेल सांगता केली. त्यांच्या स्वरसिद्ध प्रस्तुतीमुळे कामोद, सोहनी पंचम आणि शिवकल्याण अशी अनवट रागत्रयी रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद देणारी ठरली. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम), निर्भय सक्सेना व साईऐश्वर्य महाशब्दे (तानपुरा आणि स्वरसाथ) यांनी मैफिलीची रंगत वाढविणारी साथसंगत केली. शीला देशपांडे आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी कलाकारांचे स्वागत केले. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, हार्मोनिअम वादक पं. प्रमोद मराठे आदी यावेळी उपस्थित होते. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading