Wednesday, August 26, 2026
Latest NewsSports

पोर्तुगालमध्ये होणाऱ्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू सार्थक चव्हाण सहभागी !!

पुणे :  पोर्तुगालमधील ‘अल्काबिदेचे-कास्केस‌’ येथे होणाऱ्या ‘एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेच्या नवीन हंगामातील दुसरी शर्यत रविवार, १४ जुन रोजी होणार असून मौसमाच्या या दुसऱ्या शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू आणि पुण्यातील सार्थक चव्हाण सहभागी होत आहे. ‘स्टॉक युरोपियन चॅम्पियनशीप‌’ या गटामध्ये सार्थक आपले कौशल्य पणाला लावणार असून ‘क्लिन्ट ज्युनिअर टिम दा कोर्सा‌’ या संघाकडून सार्थक रेसिंग करणार आहे.

नुकत्याच मे महिन्यामध्ये या स्पर्धेच्या झालेल्या पहिल्या शर्यतीमध्ये सार्थक याची याची मोटार बाईक ‘क्रॅश‌’ झाली आणि त्याला शर्यतीमधून बाहेर पडावे लागले होते. पहिली शर्यत सुरू झाल्यानंतर सार्थक याने उत्तम सुरूवात केली होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये सार्थक पहिल्या सात खेळाडूंमध्ये आघाडीवर होता. सातव्या लॅपनंतर सार्थक याची बाईक ‘क्रॅश‌’ झाल्याने त्याला शर्यत थांबवावी लागली. स्पर्धेतील एकूण ३३ रेसिंगपटूंमध्ये सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू सहभागी झाला आहे.

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीपुर्वी बोलताना सार्थक म्हणाला की, पहिल्या फेरीमध्ये झालेल्या गोष्टी मी आता विसरून गेलो असून या शर्यतीसाठी जोरदार तयारी केली आहे. या शर्यतीमध्ये जोरदार पुर्नआगमन करण्याची माझे प्रयत्न असून यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे. या रेसमध्ये मला सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागणार आहे. हे आव्हान सोपे नसून मी पूर्णपणे एकाग्र राहिलो आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझा स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर मला यश नक्कीच मिळेल, असा विश्वास वाटतो.

याआधी थायलंडमध्ये झालेल्या ‘एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप‌’ (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याने दुसऱ्या फेरीतील दमदार पुनरागमनासह विजेतेपदाला गवणसी घातली होती. या स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता.

या स्पर्धेची तिसरी फेरी स्पेन (५ जुलै), चौथी फेरी फ्रान्स्‌ (२६ जुलै), पाचवी फेरी स्पेन (६ ऑगस्ट), सहावी फेरी स्पेन (२७ सप्टेंबर) आणि अंतिम आणि सातवी फेरी इटली (१८ ऑक्टोबर) रोजी होणार आहे.

डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.मी., रायनॉक्स आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक कपिल शेळके यांनी पोर्तुगाल रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. तसेच सार्थक याला प्लॅनेट डीएसजीचे हरजीतसिंग मक्कर यांनी पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहेत. सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading