Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

राजगड स्पोर्ट्‌स क्लब संघाला विजेतेपद !!

पुणे : रायगड स्पोर्ट्‌स क्लब तर्फे आयोजित पहिल्या ‘राजगड महिला करंडक‌’ मुलींच्या खुल्या गटाच्या आंतरक्लब ट्वेन्टी-२० क्रिकेट दिवस-रात्र स्पर्धेत अस्मि कुलकर्णी हिची फलंदाजी आणि पायल पवार हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर यजमान राजगड स्पोर्ट्‌स क्लबने ॲथेलिट स्पोर्ट्‌स क्लबचा १९ धावांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

वाघोली येथील राजगड स्पोर्ट्‌स क्लब क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना राजगड स्पोर्ट्‌स क्लबने २० षटकात ८ गडी गमावून १४३ धावा धावफलकावर लावल्या. अस्मि कुलकर्णी हिने ४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावांची खेळी करून संघाचा डाव बांधला. अर्पिता दिवेकर (१६ धावा) आणि पायल पवार (१४ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. किरण नवगिरे हिने अचूक गोलंदाजी करताना २९ धावांत तीन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ॲथेलिट स्पोर्ट्‌स क्लबचा डाव १२४ धावांवर मर्यादित राहीला. आयेशा शेख हिने ५१ धावांची खेळी करून उत्तम प्रतिकार केला होता. राजगडच्या पायल पवार हिने २२ धावांत तीन गडी तर, प्रणवी बनसोडे हिने दोन गडी बाद करून अथेलिट संघाच्या डावाला वेसण घातली. प्रणवी हिने तीन गडी धावबाद करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आणि संघाचे विजेतेपद निश्चित केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण राजगड स्पोर्ट्‌स क्लबचे संस्थापक-संचालक योगेश सातव, संदीपनाना सातव आणि ब्रम्हा मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक विनायक सुर्यवंशी, सहभागी संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक आदि मान्यवर उपस्थित होते. विजेता राजगड स्पोर्ट्‌स क्लब आणि उपविजेत्या ॲथेलिट स्पोर्ट्‌स क्लब या संघांना करंडक, पदके आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
राजगड स्पोर्ट्‌स क्लबः २० षटकात ८ गडी बाद १४३ धावा (अस्मि कुलकर्णी ७४ (४७, ११ चौकार, २ षटकार), अर्पिता दिवेकर १६, पायल पवार १४, किरण नवगिरे ३-२९, सुजाता हिंगमिरे १-२०) वि.वि. ॲथेलिट स्पोर्ट्‌स क्लबः २० षटकात १० गडी बाद १२४ धावा (आयेशा शेख ५१ (५०, ८ चौकार), श्वेता माने १६, पायल पवार ३-२२, प्रणवी बनसोडे २-२४); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अस्मि कुलकर्णी;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजः प्रणवी बनसोडे (१५ विकेट; राजगड स्पोर्ट्‌स क्लब);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः अस्मि कुलकर्णी (१५९ धावा, राजगड स्पोर्ट्‌स क्लब);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading