Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘हे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे’ – संजय राऊत

पुणे : देशात सध्या हुकूमशाहीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य जनता आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सध्याचे सरकार कार्यकर्ता ही जमातच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत केवळ चिमटे काढून चालणार नाही, तर थेट हल्ला करण्याची गरज आहे, असे परखड मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार Sanjay Raut यांनी व्यक्त केले.

कै. धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुश्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार Salil Kulkarni यांना संजय राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सलील कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सीआयडीचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ वात्रटिकार रामदास फुटाणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देताना राऊत म्हणाले की, ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. कुठल्याही अमिषाला बळी न पडता त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज मात्र राजकारणात निष्ठा आणि विचारांशी बांधिलकी कमी होत चालली असून सत्तेसाठी पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे.

सरकारवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, आज कार्यकर्त्यांना बाजारातील वस्तूप्रमाणे किंमत लावून विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधाऱ्यांसोबत न आल्यास चौकशा, कारवाई आणि तुरुंगवासाचा दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

ब्रिटिश काळातील ‘गुन्हेगारी जमाती’च्या संकल्पनेचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, आजही काही समाजघटकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी मुख्य प्रवाहात आणलेल्या उपेक्षित समाजांचे अस्तित्व पुन्हा धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

देशातील आर्थिक गैरव्यवहारांचा संदर्भ देत त्यांनी मोठ्या उद्योगपतींच्या कर्जमाफी आणि बँक घोटाळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते, मात्र मोठ्या आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींना संरक्षण मिळते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पश्चिम बंगालमधील ईव्हीएम गोदामातील आगीबाबतही त्यांनी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. तसेच अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुश्ताक पटेल यांनी या सन्मानामुळे सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. लेखक नामदेव भोसले यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अनुभव मांडत भटक्या-विमुक्त समाजाच्या आजच्या स्थितीवर भाष्य केले.

यावेळी उल्हास पवार यांनी धनंजय थोरात यांचे सामाजिक योगदान अधोरेखित केले, तर मोहन जोशी यांनी गेल्या १८ वर्षांपासून हा पुरस्कार सामाजिक आणि सांगीतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जात असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पराग करंदीकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक Sudhir Gadgil यांनी केले, तर युवराज शहा यांनी आभार मानले.

पंतप्रधानांवर टीका

देशातील सामाजिक वातावरणावर भाष्य करताना राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. “ज्या देशात पंतप्रधान आपली पदवी आणि पत्नी विसरतात, त्या देशात आम्ही मात्र धनंजय थोरात यांसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे स्मरण कृतज्ञतेने ठेवतो,” असे ते म्हणाले. तसेच महात्मा गांधी आणि Jawaharlal Nehru यांच्या योगदानाचे स्मरण कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

जनतेला निर्भय होण्याचे आवाहन

लेखक, विचारवंत आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे व्यक्त होण्याची गरज असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “पुढील पिढीला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आज निर्भयपणे बोलण्याची आणि लिहिण्याची हिंमत दाखवावी लागेल. देशातील सामाजिक वातावरण आणि लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर भूमिका बजावली पाहिजे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading