शिक्षण घेताना आलेल्या अडचणी सांगतांना पाणावले मुलींचे डोळे
पुणे : प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे असलेले शिक्षण काहींना सहज पूर्ण करता येते तर काहींना मात्र असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, विशेषतः मुलींना. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाचे (२४ जानेवारी) औचित्य साधत आजही आपल्या समाजात शिक्षण घेतांना मुलींना येणाऱ्या अडचणींवर भाष्य करणाऱ्या राहुल पणशीकर निर्मित ‘प्रभार’ या विशेष लघुपटाचे सादरीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले. आज मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या, समाजातील रूढी परंपराचा यशस्वी मुकाबला करत स्वतःचे आयुष्य घडवणाऱ्या हीना मिस्त्री या तरुणीच्या आयुष्यावर सदर लघुपट बेतला आहे. यावेळी अनुभव कथन करताना हीना मिस्त्री भावूक झाल्या व त्यांचे अनुभव ऐकून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले.
त्याचप्रमाणे बिहारच्या दरभंगा गावात जन्मलेल्या सलोनी कुमारी हिने शालेय जीवन ते दिल्ली विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यापर्यंतचा आपला जीवन प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. तसेच नवनाथ शिंदे यांनी योग्यवेळी मदत मिळाल्यास शिक्षण घेवून आयुष्याचे कसे सोने करता येते हे स्वानुभवातून सांगितले. यावेळी लघुपटाचे निर्माते राहुल पणशीकर, फ्लीटगार्ड फिल्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, अध्यक्ष संजय कुलकर्णी, राजेंद्र भिडे व विभीषण मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल पणशीकर म्हणाले की आजही आपल्या समाजात बऱ्याच ठिकाणी मुलींना शिक्षण घेतांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विविध समस्यांवर मात करून पुढे आलेल्या तरुणींची गोष्ट प्रेरणा म्हणून पुढे यावी यादृष्टीने या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभार याचा अर्थ चार्ज घेणे असा असू मुलींनी आपल्या आयुष्याचा स्वतः चार्ज घेत शिक्षण घेवून पुढे आवे असा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आरोग्य विषयक व सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने राहुल पणशीकर लघुपट निर्मिती करत असतात.
आज देशात विविध पातळींवर मुलींच्या शिक्षणाचा विषय हा गंभीर आहे. अगदी शाळेत स्वच्छतागृह नसल्याने मासिक पाळी आल्यावर शिक्षण बंद होणे ते पुरुषी मानसिकतेचा सामना करणे या सारख्या अनेक समस्या मुलींच्या शिक्षणात अडसर ठरतात. आम्ही सीएसआरच्या माध्यमातून आजवर ३५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृने बांधून दिली आहेत. ज्यावेळी आई मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते त्यावेळी मुलींना समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते व मुली शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतात, असे मत फ्लीटगार्डचे संजय कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.
