Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठी शिकविण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा दादा भुसे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षा मंडळाच्या शाळांना मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. मराठी शिकविण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. 

इंग्रजी शिकणे महत्त्वाचे असले तरी देखील महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवले जाणे आवश्यकच आहे. त्यासाठी त्याचा कायदाच करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय, केंद्रीय अथवा खाजगी अशा कोणत्याही परीक्षा मंडळांचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांना मराठी शिकविणे सक्तीचे आहे, असे दादा भुसे यांनी निदर्शनास आणून दिले. 

आंतरराष्ट्रीय व केंद्रीय परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच अन्य माध्यमांच्या शाळा यांच्यावर शिक्षण विभागाची करडी नजर राहणार आहे. मराठी शिकवण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांबद्दल पालकांना देखील शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करता येणार आहे. मराठी भाषेचे प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी अशा शाळांमधील शिक्षकांना देखील मराठीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे भुसे यांनी सांगितले. 

शालेय शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भुसे सध्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या संघटना, विविध शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करीत आहेत. त्यानंतर लवकरच राज्याच्या शिक्षण धोरणाची दशसूत्री जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही भुसे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading