महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे राज ठाकरे यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते विसरून महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. आपापल्या विभागात पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी विभाग प्रमुखांना केले.
पुढील तीन महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता असून इतर पक्षांबरोबरच मनसेने देखील महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या मुंबईतील 36 विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 130 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्याचे आदेश ठाकरे यांनी विभागपमुखांना दिले आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई आणि राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षांतर्गत एक अभ्यास गट स्थापन केल्या जाणार आहे. पक्षाची पुढील वाटचाल, अन्य पक्षांसोबत युती, आघाडी करण्याबाबतचे धोरण निश्चित करताना या अभ्यास गटाचा सल्ला विचारात घेतला जाणार आहे.
