Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आशीष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई:  सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी देखील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

कालच राज ठाकरे यांनी मनसेच्या मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाला विसरून आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत विभागप्रमखांना दिले. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी शेलार आणि ठाकरे यांची भेट होणे लक्षणीय आहे. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेने ‘एकला चालो रे’ या धोरणाचा अवलंब करीत 130 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. 

मुंबई महापालिकेवर दोन दशकांहन अधिक काळ शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता शिवसेनेची दोन शकले पडली असून शिंदे गट भाजपबरोबर आहे. आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्वच जणू अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही मुंबईत सत्ता राखण्याचा जीवापाड प्रयत्न केला जाणार आहे. 

या पार्श्वभूमीवर शेलार आणि ठाकरे यांची भेट लक्षणीय आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणे गरजेचे आहे. राजकीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मनसेकडून एका अभ्यास गटाची नियुक्ती केली जाणार असून पक्षाची आगामी वाटचाल आणि इतर पक्षांशी युती करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी या अभ्यास गटाच्या शिफारशी विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्थातच आगामी निवडणुकीत इतर पक्षांशी युती करण्याचे मार्ग मनसेने खुले ठेवले असल्याचे दिसून येत आहे. त्या दृष्टीनेही शेलार आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading