Saturday, November 7, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले पियानोचे स्वर

पुणे  : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळचे सत्र विख्यात संगीत कलाकार अदनान सामी यांच्या पियानो वादनाने अनोखे ठरले. पं. मिलिंद चित्ताळ यांच्या परिपक्व गायनालाही श्रोत्यांनी पसंतीची दाद दिली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरु आहे.

संगीत क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या अदनान सामी यांच्या ‘सवाई’च्या स्वरमंचावरील सादरीकरणाविषयीची कमालीची उत्सुकता मंडपातील हाऊसफुल्ल गर्दी देत होती. सायंकाळी सव्वापाच वाजता अदनान सामी यांचे वाद्यासह स्वरमंचावर आगमन होताच मंडपात चैतन्याची लहर पसरली. विशेषत: तरुणाईने अदनान यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“मला आज प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो. पं. भीमसेनजी आणि माझे विशेष कनेक्शन होते. मी टीन एजर असताना प्रथमच मी त्यांचे गाणे ऐकले आणि भारावून गेलो होतो. असा आवाज, असे गाणे, असे सादरीकरण, असे व्यक्तिमत्व आणि असा ‘असर’ मी कधीच अनुभवला नव्हता आणि जग फिरुन झाल्यावरही अनुभवलेला नाही. खरोखरच ‘भारतरत्न’ हा सन्मान भीमसेनींमुळे अधिक बुलंद झाला आहे. कलेच्या सर्वोच्च गुणवत्तेचा तो दीपस्तंभ आहे. त्यांना कधीही ऐका, त्यांना तोड नाही, ते अजोड आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. योग्यता, गुणवत्ता यांचा आदर्श म्हणजे भीमसेनजी”, असे सामी म्हणाले.

ते किती उदारमतवादी होते, याचे उदाहरण सांगतो. मी पियानोवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवण्याचा प्रयत्न करतो, असे मी पं. भीमसेनजींना सांगितले. त्यावर ते प्रतिकूल मत नोंदवणार, असेच मला वाटले होते. पण मी आश्चर्यचकित झालो कारण भीमसेनजी म्हणाले,’ बहुत अच्छा कर रहे है. परंपरा वाहती ठेवायची असेल तर त्यामध्ये नवे प्रवाह मिसळले पाहिजेत. नवे, वेगळे विचार स्वीकारले पाहिजेत. काळानुरूप योग्य आणि आवश्यक बदल स्वीकारले पाहिजेत, त्यांचे हे विचार किती प्रगल्भ आहेत, अशी आठवण अदनान सामी यांनी सांगितली.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणी सतत जाग्या आहेत. माझा पहिला अल्बम झाकीर भाईंच्या साथीने सजला होता. १२ डिसेंबर रोजी आमची मैफल ठरली होती, जी आता शक्य नाही, अशी खंतही अदनान सामी यांनी व्यक्त केली.

राग यमन मधील रचनेने अदनान सामी यांनी पियानो वादनाला सुरवात केली’. रूपक तालात सुरवातीला वादन करून त्यांनी द्रुत त्रितालातील रचना पेश केली. तबल्याच्या जोरदार आणि ढंगदार साथीने त्यांनी पियानोची टोनल क्वालिटी अधोरेखित केली. शिवरंजनी मधील एक धून ऐकवल्यावर रसिकांच्या आग्रहाला मान देत अदनान यांनी राग बागेश्रीवर आधारित एक रचनाही पेश केली. त्यांच्या वादनाला ज्येष्ठ तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांनी अतिशय उठावदार साथ केली.

तत्पूर्वी प्रसिद्ध गायक पं. मिलिंद चित्ताळ यांनी गायिलेला राग ‘मधुवंती’ त्यांच्या प्रतिभेचे आणि विद्वत्तापूर्ण सादरीकरणाचा प्रत्यय देणारा ठरला. विलंबित एकतालात ‘सो बलमा मोरे…’ ही रचना त्यांनी पेश केली. त्यापूर्वी त्यांनी केलेली नोम् तोम् रागाचे शांत, सुरेल वातावरण निर्माण करणारी होती. द्रुत त्रितालातील ‘तूही बडा गरिबनवाझ…’ ही बंदिश रागाचे कसदार स्वरचित्र रेखाटणारी ठरली. सूरदासांच्या रचनेची अनुभूती रसिकांना देतानाच त्यांनी गुरू पं. फिरोज दस्तूर यांनी गाजवलेल्या ‘गोपाला मेरी करुणा…’ या भक्तिरचनेने गायनाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), माऊली टाकळकर (टाळ), व प्रवीण कारदगी व अभोगी सेवेकर यांनी तानपुरा साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply