Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

नृत्यांगना शोभना यांच्या डौलदार पदन्यास आणि समर्थ अभिनयाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे : विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना शोभना यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा, यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्यांनी सहगायनातून त्यांना अर्पण केलेल्या आदरांजलीने ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगता झाली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे आकर्षण भरतनाट्यम नृत्यांगना शोभना यांचा नृत्याविष्कार हेच होते. शोभना यांनीही रसिकांची अपेक्षापूर्ती केली.

आदी शंकराचार्य विरचित ‘सौंदर्यलहरी’ या स्तोत्रातील अंशभागावर आधारित मंगलाचरण त्यांनी सादर करत नृत्याला प्रारंभ केला. त्यानंतर शोभना यांनी समुद्रमंथनाचा पौराणिक कथाभाग नृत्यातून आविष्कृत केला. त्यांच्या संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन यातून घडले. स्वर्गातून पृथ्वीवरचा गंगा नदीचा प्रवास त्यांनी गंगावतरण या कथानकाद्वारा उलगडला. अष्टनायिकांपैकी ‘कलहान्तरिका’ या नायिकेचे नृत्यरूप शोभना यांनी प्रभावीपणे सादर केले.

त्यानंतर त्यांनी श्रीरामचरित्रातील काही प्रसंग सादर केले. सीता विवाहासाठी लावलेला शिवधनुष्याचा पण, हा प्रसंग, श्रीरामांनी केलेला धनुष्यभंग, वनवासात असताना घडलेला शूर्पणखा प्रसंग, मग झालेले सीता हरण, जटायूवध, हनुमानाच्या शेपटीला लावण्यात आलेली आग….हे सारे प्रसंग शोभना यांनी सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यांनिशी दर्शवल्या. त्यांच्या उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांना राधा बत्री (गायन), मुत्थूकुमार (बासरी), भवानी प्रसाद (वीणा), अनंता आर कृष्णन् (मृदंगम्), विद्या शैलेश (नटुअंगम्) यांनी पूरक साथसंगत केली.

यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्यांनी सहगायनातून आपल्या गुरुंना अभिवादन केले. आरती ठाकूर कुंडलकर यांनी राग मधुकंस मध्ये ‘आये री श्याम…’ आणि ‘माने ना माने ना…’ या बंदिशी सादर केल्या. अश्विनी मोडक यांनी राग राग मधुरकंस मध्ये ‘कान्हा श्याम मनमोहन…’ आणि ‘पार करो मोरी नैया…’ या रचना सादर केल्या. चेतना पाठक यांनी राग बागेश्री मध्ये ‘बन बन ढूँडन’ आणि तराणा सादर केला. अतींद्र सरवडीकर यांनी स्वनिर्मित राग प्रभावती मध्ये ३ रचना गायिल्या.

त्यांना माधव मोडक आणि संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आकांक्षा देसाई, मीनलता जोशी, विनय यादव आणि पल्लवी घोडके (तानपुरा) यांनी साथ केली. ‘जगत जननी भवतारिणी’ या भैरवीने त्यांनी विराम घेतला. प्रतिवर्षीच्या परंपरेनुसार सवाई गंधर्व यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिकेने महोत्सवाची सांगता झाली.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची निवेदनाची जबाबदारी समर्थपणे सलग ३३ वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ह्द्य सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष पं. श्रीनिवास जोशी यांनी देशमुख यांचा सत्कार केला.

‘अतिशय संयमित, मोजके आणि नेमके बोलणे, हे देशमुख यांच्या निवेदनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे अभ्यासू वृत्ती आहे. भाषेची उत्तम जाण आहे. कलाकारांशी त्यांचा संपर्क आहे आणि या क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्यांचे प्रसंगावधान उल्लेखनीय आहे, असे श्रीनिवास जोशी म्हणाले.

केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सवाई गंधर्व महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading