कलार्पण संगीत विद्यालय तर्फे शास्त्रीय संगीत वारसा अमेरिकेत…..
पुणे – आपल्या शिष्याने केलेली प्रगती, हा गुरुसाठी आनंदसोहळा असतो. आज मी असा आनंद अनुभवत आहे, असे उद्गार प्रसिद्ध गायक गुरू सूरमणी पं. सुधाकर तळणीकर यांनी शनिवारी येथे काढले.
पुण्यातील ‘कलार्पण’ संस्थेतर्फे अमेरिकेतील गायक कवी अमेय बनसोड यांच्या ‘काव्यमेय’ या कवितासंग्रहचे प्रकाशन शनिवारी दुपारी भरत नाट्यमंदिर, सदाशिव पेठ येथे झाले. यानिमित्ताने सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी तळणीकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत दाणी, उत्तर प्रदेश येथील कलार्पण संस्थेचे दिगंबर तिवारी,गायक प्रा. विठ्ठल कुमावत, व्यासपीठावर उपस्थित होते.
पं. तळणीकर यांनी अमेय बनसोड यांनी कलाक्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. अमेरिकेत आधी शिक्षणासाठी आणि आता नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करणाऱ्या अमेयने मी जे शिकवले ते अल्पावधीत आत्मसात केले आहे. मला त्याचा आनंद आहे. यापुढे त्याने अशीच मेहनत करावी. जे शिकवले ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
अभिनेते चंद्रकांत दाणी यांनी अमेरिकेत स्थायिक होऊनही अमेय यांनी जपलेले भारतीय कलेचे प्रेम उल्लेखनीय आहे. आपल्या मातीशी तो जोडलेला आहे. संगीताप्रमाणे कवितासंग्रहाच्या रुपाने त्याने साहित्य प्रेमही जपले आहे, असे ते म्हणाले.
सूरमणी पं. सुधाकर तळणीकर आणि ‘काव्यमेय’ काव्यसंग्रहाचे कवी गायक अमेय बनसोड (अमेरिका) यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला. मंदार तळणीकर (सहगायन व हार्मोनियम) आणि पल्लवी लोखंडे (सहगायन ), केदार तळणीकर (तबला) आणि गणेश पापल्(पखवाज) यांनी साथ केली. भास्कर पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशनानंतर सादर झालेल्या या संगीताच्या कार्यक्रमात सुगम, नाट्यसंगीत व अभंगवाणीचा समावेश होता. काही संगीतरचना पं. सुधाकर तळणीकर यांच्या होत्या.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गायक,कवी अमेय बनसोड यांनी पंढरीच्या तिरी, जय गंगे भागीरथी, या विठुचा गजर हरिनामाचा, , सुरत पिया, हरिभजनाविण काळ घालवू नको रे, जय शंकरा, सूर निरागस हो, घेई छंद, इत्यादी गीते सादर करून रसिकांना खिळऊन ठेवले आणि रसिकांची दाद मिळवली. तर गायक संगीतकार मंदार तळणीकर यांनी पटदीप रागातील मर्म बंधातली ठेव ही हे नाट्यगीत आणि माझे माहेर पंढरी सादर करून दुर्गा रागाचा देखील वेगळा स्वराभास रसिकांना दाखवला आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सूरमणी पं.सुधाकर तळणीकर यांनी कानडा राजा पंढरीचा ,जुन्या ठेवणीतील ठुमरी व तरणा गाऊन रसिकांची मने जिंकली त्यांच्या गाण्यातून आलापीतून संगीतमय धबधबा याची अनुभूती आली ही सर्वात मोठी रसिकांची दाद होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते भास्कर पावसकर यांनी केले.
