सवाईच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘अहिरभैरव’ची छाया
पुणे : ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर लोकप्रिय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायनाची स्वरमुद्रा उमटली. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीतील व्हायोलिन आणि बासरीवादनाला जुगलबंदीलाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरु आहे.
“आपण कुणीच झाकीर हुसैन यांना विसरू शकत नाही असे कार्य त्यांनी केले आहे. मी याच स्वरमंचावर झाकीरभाईंना ४० वर्षांपूर्वी भेटलो होतो. गुरुजी पं. जसराज यांच्या गायनात मी तानपुरा साथ करत होतो. त्यांचे स्मरणही उर्जा देणारे आहे. पं. भीमसेनजींच्या मनात माझ्याविषयी हळवा कोपरा होता, त्याचा अनुभव मी घेतला आहे. मी झाकीरभाई आणि भीमसेनजी तसेच गुरू पं. जसराज यांच्या स्मृतींना वंदन करून गायन सुरू करतो,” असे मनोगत पं. संजीव अभ्यंकर यांनी सुरवातीला व्यक्त केले.
राग अहिरभैरवमध्ये विलंबित एकतालात ‘रसिया म्हारा’ हा ख्याल त्यांनी प्रथम सादर केला. शांत आलापीतून रागाची वातावरण निर्मिती त्यांनी उत्तम साधली. ‘सावनकी झरने लगे है…’ ही द्रुत त्रितालातील रचना दाद मिळवणारी ठरली. तिन्ही सप्तकांत लीलया संचार करणारा सुरेल आवाज, आकर्षक ताना, स्वरसंवाद साधत खुलत जाणारी कामगत, ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये जाणवली. चढत्या माध्यान्हीला अनुसरून त्यांनी राग ‘शुद्ध सारंग’ मध्ये ‘सावरे सो प्रीत लगायी…’ ही त्रितालातील रचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी समर्थ रामदासांचा ‘ध्यान लागले रामाचे…’ हा अभंग सादर केला.
त्यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक दिनकर (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), साईप्रसाद पांचाळ व धनंजय म्हसकर (गायन साथ), मुक्ता जोशी व ऋचा अभ्यंकर (तानपुरा) यांनी साथ केली.
चढती दुपार संस्मरणीय ठरली ती शशांक सुब्रह्मण्यम यांच्या बासरीवादन आणि आर. कुमरेश यांच्या व्हायोलिन जुगलबंदीमुळे. कर्नाटक शैलीच्या रागातील विविध ‘कृती’ या कलाकारांनी सादर करून रसिकांना वेगळा आनंद दिला. छोट्या छोट्या स्वराकृती आणि तालाचे खंड, यांच्या मेळातून या दोन्ही कलाकारांनी आगळेवेगळे स्वरचित्र रेखाटले. राग सिहेंद्रमध्यम मध्ये पल्लवी अनुपल्लवी म्हणजे आलाप,जोड, झाला अशा पद्धतीने वादनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
राग बिलावल या जनक रागाशी साधर्म्य साधणारा राग त्यांनी प्रस्तुत केला. आलापीतील भावपूर्ण सुरावटी स्वरांचे सूक्ष्म नक्षीकाम दर्शवणाऱ्या होत्या. आदितालातील हे सहवादन रंगतदार ठरले. मेरुखंड स्वरपद्धतीने स्वरांच्या विविध स्वरावलींमधून रागाचे विविध पदर उलगडत होते. गमक, तंत अंग, लयकारी यांनी सुरेल असे गायन सदृश्य वादन रसिकांना ऐकायला मिळाले. वादनातील एकमेकांचे सौहार्द उल्लेखनीय होते. त्यांच्या वादनाला अनुरूप अशी साथसंगत पं रामदास पळसुले (तबला), पारुपल्ली फाल्गुन (मृदंगम्), रवी पांचाळ (तानपुरा) यांनी केली.
