Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शासकीय कामात ए. आय. उपयुक्त‌‘ कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य‌’ विषयावर चर्चासत्र

 

पुणे : शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर प्रभावीपणे होत असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापरण्यास सोप्य आणि उत्तम ॲप्सचीही निर्मित होते. यामुळे प्रशासकीय कामकाजात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. माहितीचे (डेटाबेस) संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शासकीय कामे एका क्लिकवर होण्यास मदत होणार असे मत चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य‌’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश यादव, भूमापन उपसंचालक कमलाकार हट्टेकर, नगर भूमापन उपसंचालक डॉ. राजेंद्र गोळे, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी वरिष्ठ अधिव्याख्यात विकास गरड यांनी संवाद साधला.

डॉ. ओमप्रकाश यादव म्हणाले, स्पर्धा परिक्षांची तयारी करताना माहिती मिळविण्यासाठी खूप वाचन केले. परंतु प्रत्यक्ष काम करतेवळी वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. अनेक शासकीय विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. कार्यप्रणाली सहज सोपी व्हावी म्हणून स्वत: अनेक ॲप्स तयार केली आहेत आणि यशस्वीपणे या ॲप्सचा वापर करत आहे. डिजिटल धोके-तोटे ओळखण्यासाठी तंत्रस्नेही असणे तसेच जागरूक असणे आवश्यक आहे.

कमलाकर हट्टेकर म्हणाले, विविध विषयांचा अभ्यास करताना तंत्रस्नेही असण्याची गरज लक्षात आली. यातूनच विभागाच्या सुलभ कामकाजाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. यातून इ-मॅपिंग, डिजिटल क्रॉप सर्व्हे अशा प्रणाली विकसित केल्या.

पुस्तकांचे गाव वसविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या डॉ. राजेंद्र गोळे यांनी कल्पन नजरेची गरज, ब्रँडिंग याची महती सांगितली. प्रशासनात काम करताना उत्तम साहित्यकृतींचा वापर करता येतो. शासनाच्या विविध खात्यांमध्ये माहिती संकलनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना भाषा आणि कलाकृतींची सांगड घालत अनेक ॲप्सचा प्रभावी वापर व्हावा, कामकाजातील अचूकता वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सतीश बद्धे म्हणाले, शासकीय कामकाजात विविध प्रकारच्या माहितींचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागते या करिता तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास काम सुकर होते. हे लक्षात घेऊन कोरोना काळात महत्त्वाच्या माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणात केले. विविध शासकीय अभियान राबविताना माहिती एका क्लिक मिळत गेल्याने कामाची गती आणि अचूकता वाढीस लागली.

विश्वास गरड यांनीही प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी आपली मते मांडली. आताच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात सुलभता आली आहे. तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापराबरोबरच विविध विभागांशी माहितीसाठा जोडला गेल्यास कार्यात अधिक प्रमाणात सुलभता येऊ शकते. परंतु माहिती सुरक्षित राहणे, तंत्रज्ञान वापरातील धोकेही ओळखणे आवश्यक आहे. सत्वर-सुशासनासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर उपयुक्त ठरू शकतो.
मान्यवरांचा सत्कार राजीव नंदकर यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading