Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील गायिका नंदिनी राव गुजर यांना उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार प्रदान

पुणे  : पुण्यातील गायिका नंदिनी राव गुजर यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा २०२२-२३ सालचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्‍ट्रीय केंद्रामध्‍ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुगम संगीत विभागात सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणीश चावला यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ताम्रपत्र आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्‍या सहसचिव उमा नांदुरी, संगीत नाटक अकादमीच्या अध्‍यक्षा डॉ संध्या पुरेचा, उपाध्‍यक्ष जोरावरसिंह जाधव व सचिव राजू दास हे देखील यावेळी उपस्थित होते.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार हा संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक कला आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आश्वासक युवा कलाकारांना २००६ सालापासून दरवर्षी प्रदान करण्यात येतो. नुकतेच २०२२- २०२३ सालचे हे सन्मान नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. या आधी देशातील अनेक दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे हे विशेष.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या नावाने मिळालेला उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी कौतुकाची विशेष थाप आहे. दक्षिण भारतापासून दूर राहत असताना कर्नाटक संगीतात मी करत असलेल्या प्रयत्नांना यानिमित्ताने प्रोत्साहन मिळाले अशा भावना गुजर यांनी व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीत क्षेत्रात पुढेही कार्यरत राहण्यासाठी या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गायिका नंदिनी राव गुजर यांबद्दल –
आकाशवाणीच्या ए ग्रेड कलाकार असलेल्या नंदिनी राव गुजर यांचा जन्म कर्नाटकातील हासन येथे झाला. त्यांनी प्रसन्न व्यंकटेश यांकडे कर्नाटक संगीताचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी बीआर श्रीधर आणि रंजनी गायत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम घेतली. सध्या बंगळूरूच्या विदुषी प्रो. नागमणी श्रीनाथ यांकडे त्यांचे शिक्षण सुरु आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि रवींद्र संगीत याचेही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

आजवर देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठेच्या संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणासोबतच अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, मस्कत यासारख्या परदेशात देखील त्यांनी अनेक कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. कर्नाटक शासनातर्फे देण्यात येणाऱ्या कॅम्पे गौडा पुरस्कारासह देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी आजवर त्यांचा गौरव करण्यात आला आहे. नंदिनी या भारतातील वेगवेगळ्या बारा भाषांमध्ये भक्ती संगीत गातात यासोबतच या भाषांमध्ये ऑडीओ व व्हिडीओची निर्मिती देखील करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading