Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

शरद गोरे यांना प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार

मुंबई : सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. 

मागील तीस वर्ष गोरे यांनी साहित्य संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी आजवर कोणतीही शासकीय मदत न घेता साहित्यिक व रसिकांच्या सहभागातून १७६ हून अधिक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. इतकी साहित्य संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती आहेत.

गोरे यांनी ५ मराठी चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार व अभिनेता म्हणून काम केले आहे. त्यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास: सूर्या’ या चित्रपटाने फ्रान्स देशातील  कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जर्मनीतील बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आपली जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे,

विविध विषयांवर आजवर हजारो व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आपल्या अनोख्या भाषणशैलीसाठी ते विशेष परिचित आहेत. त्यांनी आजवर १० ग्रंथाचे लेखन केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये लिहिलेल्या बुधभूषण ह्या ऐतिहासिक ग्रंथाचा गोरे यांनी मराठीत काव्य अनुवाद केला आहे. ते प्रकाशक व संपादक असलेल्या युंगधर प्रकाशन या संस्थेने १५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

गोरे यांना मिळालेल्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading