बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते – नितेश राणे
सिंधुदुर्ग: हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना लाथ मारून मातोश्रीच्या बाहेर काढले असते, अशी विखारी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा आणि जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया येथे या मोर्चासमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना उद्देशून, भारताबाहेर चालते व्हा, अशा अर्थाचे विधान केले. या विधानावर राणे यांनी पलटवार केला.
उद्धव ठाकरे पाकिस्तानचे एजंट
औरंगजेबाच्या पिल्लावळीने इतरांवर शिवद्रोही असल्याचे आरोप करू नयेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच राज्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे एजंट आहेत, असे आरोप राणे यांनी केले.बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. ते आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर घालवून दिले असते, असेही राणे म्हणाले.
यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. शिल्पकार जयदीप आपटे यांना शिवछत्रपती पुतळ्याचे काम देण्यासाठी मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या अरोपावरही राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
रश्मी ठाकरेंकडून दबाव
फर्निचरसाठी भांडणाऱ्या या बाईंच्या घरी चार सोफा आणि दोन टेबल पाठवून दिली तर त्या गप्प बसतील, अशी टीका राणे यांनी केली. यापूर्वी ठाकरे यांच्या गटात असलेल्या शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर राणेंच्या विरोधात राळ उडवून देण्यासाठी रश्मी ठाकरे यांचा दबाव होता, असा दावा करीत राणे यांनी अंधारे यांच्यावरही असा दबाव असल्याचे सूचित केले.
