Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

गणित फक्त गुंतागुंतीचे नसते. ते रंजनही करते, अंजनही घालते – अच्युत गोडबोले

 

पुणे – गणित हा गुंतागुंतीचा, तर्कशुद्ध आणि वरवर पाहता कठीण विषय, असे अनेकांना वाटते. पण गणिताचा पाया अनेक विद्याशाखांच्या मुळाशी आहे. गणितात गोष्टी असू शकतात, साहित्याप्रमाणे गद्य-पद्य असू शकते, कोडी, खेळ असतात. हे सारे रंजन करणारे आणि अंजन घालणारे ठरू शकते. फक्त तशा शैलीने त्याची मांडणी व्हावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डाॅ. अच्युत गोडबोले यांनी शनिवारी येथे केले.

सीगल प्रकाशनातर्फे डाॅ. बीना लिमकर लिखित ‘द सिक्रेट लाईफ ऑफ फंक्शन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. गोडबोले यांच्यासह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. विनय वैद्य, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष डाॅ. आनंद लेले, प्राचार्या वृषाली सहस्त्रबुद्धे तसेच लेखिका बीना लिमकर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कर्वे शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

गणित हा विषय गुंतागुंतीचा आणि म्हणून अनेकांना आवडणारा नसला, तरी बीना लिमकर यांनी तो अतिशय सोपा, सहज तरीही नेमकेपणा अबाधित राखून मांडला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते अभियांत्रिकी पदवीधरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल आणि समजेल, अशा पद्धतीचे उत्तम लेखन लिमकर यांनी केले आहे. लिमकर यांच्या या लेखनामुळे विद्यार्थ्यांची गणिताची आवड वाढेल आणि भीती जाईल, असेही ते म्हणाले. गोडबोले यांनी जागतिक आणि भारतीय स्तरावरील अनेकानेक गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधकांची उदाहरणे व किस्से ऐकवत गणित या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. गणित हा गुंतागुंतीचा आणि तर्कशुद्ध विषय आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून गणित या विषयाची मोठी ज्ञानपरंपरा आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त असे प्राचीन गणितज्ञ आपल्याला ज्ञात आहेत. नजिकच्या काळात रामानुजम यांचे कार्य लक्षणीय होते. अशा विषयाशी वाचकाला जोडणारे असे लेखन हे डाॅ. लिमकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. गोष्टीरूपात हे पुस्तक जणु संवाद साधणारे आहे. पुस्तकाची निर्मितीही अतिशय देखणी आहे. उत्कृष्ट इलस्ट्रेशन्स, डायग्राम्स, स्केचेस..यांतून रिलेशन्स, फंक्शन्स आदी महत्त्वाच्या गणितीय प्रक्रिया उलगडल्याने पुस्तकाची गुणवत्ता, वाचनीयता वाढली आहे, असे ते म्हणाले.

डाॅ. वैद्य म्हणाले, डाॅ. बीना या अभियांत्रिकीतज्ज्ञ आहेत, व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत. त्यांनी डाॅक्टरेट प्राप्त केली आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन दशके महत्त्वपूर्ण पदांवर योगदान दिले आहे. त्या उत्तम सतार वाजवतात. त्या उत्कृष्ट शिक्षिका, संशोधक आहेत आणि आता त्या उत्तम लेखिका असल्याचेही त्यांनी सिद्ध केले आहे. सर्वार्थाने आंतरविद्याशाखीय अशा स्वरुपाचे त्यांचे हे कार्य आहे. चांगला शिक्षक हा फक्त उच्च प्रतीचे शिक्षण घेतलेला असतो, असे नव्हे तर जो विद्यार्थ्यांचे उत्तम मनोरंजनही करण्याची क्षमता बाळगतो, तो उत्तम शिक्षक, असे मी मानतो. डाॅ. बीना या अशा उत्तम शिक्षक आहेत, याचा मला आनंद वाटतो.

प्रा. सहस्त्रबुद्धे यांनी गोष्टींमधून फंक्शनकडे नेणारे हे पुस्तक वाचक आणि गणित, या विषयामधील सेतू होईल, असे मत मांडले. पाठ्यपुस्तकेही अशा पुस्तकाप्रमाणे असावीत, जी उघडताच सकारात्मकता आणि अनुकूलता निर्माण करतील, असेही त्या म्हणाल्या. डाॅ. लेले यांनी अशी पुस्तके एकापाठोपाठ अशा मालिकेप्रमाणे लिहिली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. डाॅ. लिमकर यांचे शिक्षण क्षेत्रासाठी ते मोठे योगदान ठरेल, असे ते म्हणाले.

मनोगत मांडताना लेखिका डाॅ. बीना लिमकर म्हणाल्या, आकड्यांशी माझे नाते आईने जोडून दिले, जे नंतर शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे वाढत गेले. डॉ. वैद्य सरांनी पुस्तक लेखनाची प्रेरणा आणि माझे पती संदीप लिमकर यांच्या पाठिंब्यामुळे मला हे पुस्तक लिहिता आले. गणित ही निसर्गाची भाषा आहे, ते मूळ आहे. तो पाया आहे, तो भक्कम आणि पक्का असेल, तर आयुष्यात पुढच्या वाटा सुकर होऊ शकतात. साहित्यात जसे गद्य – पद्य असते, तसेच आकडे हे गणितातले गद्य तर फंक्शन्स हे गणितातले पद्य असते, चॅप्टर हे कवितेसारखे वाटतात, असेही त्या म्हणाल्या.

गौतम चांदेकर यांनी डाॅ. लिमकर यांचा परिचय करून दिला. अनघा सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. अमित राजूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading