Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONAL

पतीने पत्नीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर पत्नीवर पतीला निरोप देण्याची वेळ

तिरुअनंतपुरम: भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असणाऱ्या जोडप्यातील पतीने पत्नीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर पत्नीवर पतीला निरोप देण्याची वेळ आली. प्रशासन सेवेतील ही अनोखी घटना चर्चेत असून समाजमाध्यमातून या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

केरळचे मुख्य सचिव डॉ. व्ही वेणू हे प्रशासकीय सेवेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यानंतर मुख्य सचिव पदाची सूत्र त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे हा पदभार घेणाऱ्या शारदा यांचे स्वागत डॉ. वेणू यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तर शारदा यांच्यावर आपल्या पतीला प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल निरोप देण्याची वेळ आली. 

डॉ वेणू आणि शारदा हे दोघेही सन १९९० च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. मात्र, त्या दोघांच्या वयामध्ये आठ महिन्याचे अंतर आहे. त्यामुळे डॉ. वेणू हे शारदा यांच्यापूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर शारदा यांनी त्यांच्याकडून केरळच्या मुख्य सचिव पदाचा भार स्वीकारला असून त्या आठ महिने या पदावर असणार आहेत. 

खुद्द माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी शारदा यांचे मुख्य सचिव म्हणून डॉ वेणू यांच्याकडून स्वागत होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसिद्ध केला असून तो आत्तापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे. पतीने प्रशासकीय सेवेतील आपल्या पदाची सूत्र आपल्या पत्नीकडेच सोपविण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading