Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बदलापूर घटने नंतर राज्य सरकार कडून शाळांना नवे नियम लागू

मुंबई : बदलापूर (Badlapur) येथे शाळेच्या स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याने दोनच चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडल्यावर सरकारने सर्व शाळांसाठी पाच नवे नियम तातडीने लागू केले आहेत. या नियमांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शिक्षण संस्थांना देण्यात आले आहेत.

शाळेतील महिला स्वच्छतागृह नजीक महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, दर महिन्याला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणे, महिला पालक आणि शिक्षिका यांची विद्यार्थिनी सुरक्षा समिती स्थापन करणे, शाळांमध्ये स्व सुरक्षा अभियान सुरू करणे आणि शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांच पोलीस पडताळणी करणे, हे नियम राज्यातील सर्व शाळांना लागू होणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे नियम जाहीर केले आहेत.

बदलापूरमध्ये ही घटना घडल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळून आला. नागरिकांनी रस्त्यावर उतरून शाळेसमोर व रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. आंदोलक नागरिक रेल्वे रुळावरून उठत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेचा संबंध जोडून शाळेवर संताप व्यक्त करू नका, असे आवाहन संबंधित संस्थाचालकांनी डोळ्यात पाणी आणून बदलापूरकरांना केले. आजही या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटत आहेत.

या घटनेचेही राजकारण 

माणुसकीला लाजवणाऱ्या या घटनेचेही इरीशिरीने राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली असून त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना रामगिरी महाराजांना भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलींच्या कुटुंबीयांना भेटायला वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळालेले यश विरोधकांच्या डोळ्यात खुपत असून त्यामुळेच बदलापुरात आंदोलन करण्यात आले, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading