पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सीबीआय वरिष्ठ न्यायालयात मागणार दाद
मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निकालाविरोधात सीबीआय वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी करत आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर लढा देण्याचे निर्देश शहा यांच्याकडून सीबीआयला देण्यात आले आहेत.
दरम्यान, पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निकालाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सर्व आरोपी निर्दोष ठरत असतील तर हत्या नेमकी कोणी केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुरुवातीपासूनच तपास प्रक्रियेबाबत संशय असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबीयांच्या वतीनेही उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय जाहीर केला.
ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, राज्य पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्यानेच सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, तपासाला विलंब झाला आणि अद्यापही हत्येचे गूढ कायम असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
