Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पवनराजे निंबाळकर हत्याकांडात सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर सीबीआय न्यायालयाचा निकाल


मुंबई  : काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयात निकालाच्या वेळी डॉ. पद्मसिंह पाटील, त्यांचे कुटुंबीय तसेच पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चालक समद काझी यांच्या कुटुंबीयांनीही न्यायालयात हजेरी लावली होती.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून हा हल्ला केल्याचा आरोप होता.
या प्रकरणात पवनराजे यांचे चुलत बंधू आणि तत्कालीन प्रभावी नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. धाराशिव जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील वर्चस्वाच्या संघर्षातून हा कट रचल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता.
सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीआयडीकडे आणि त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. 2009 मध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. 2011 पासून सुरू असलेल्या सुनावणीत एकूण 128 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही या खटल्यात साक्ष दिली होती.
अखेर दोन दशकांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुरेसे ठोस पुरावे नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading