परभणीत भीषण दुर्घटना : हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळून 6 भाविकांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचा काही भाग अचानक कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 30 ते 40 जण जखमी झाले आहेत.
शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. यावेळी सभामंडपातील खांब आणि छताचा भाग अचानक कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रशासनाला मदत आणि बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सभामंडप कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
