जय शहा होणार आयसीसीचे आगामी अध्यक्ष
बंगळुरू (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा हे आयसीसी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे नियमन करणाऱ्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्षपद मिळवणार आहेत. मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच त्यांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी आपण स्पर्धेत नसल्याचे जाहीर केले आहे.
जय शहा यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांच्या क्रिकेट नियामक मंडळाने ही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जय शहा अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
जय शहा हे केवळ 35 व्या वर्षी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार असून सर्वात कमी वयात ही जबाबदारी स्वीकारण्याचा विक्रम शहा यांच्या नावे होणार आहे. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
आयसीसी चे अध्यक्ष पदाचा कार्यकाळ दोन वर्षाचा असतो. एक अध्यक्ष सलग तीन कार्यकाल पदावर राहू शकतो. बार्कले यांनी सन 2020 पासून दोन कार्यकाळ अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तिसऱ्या कार्यकाळात अध्यक्ष पदासाठी उत्सुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जय शहा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सचिव असून आयसीसीमधील प्रभावशाली चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. आयसीसी अध्यक्षपदासाठी 16 देशांच्या क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी मतदान करतात. अध्यक्षपदावर येण्यासाठी साधारण बहुमत मिळवणे आवश्यक असते. यापूर्वी अध्यक्ष पदासाठी तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता होती. जय शहा यांचे आयसीसीमध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांच्या प्रतिनिधींशी सलोख्याचे संबंध आहेत. अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत २७ ऑगस्ट परत आहे. अध्यक्ष पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवडणुकीने अध्यक्ष निवडला जाणार आहे. मात्र, या अध्यक्षपदासाठी जय शहा यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
