Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील ‘खोके सरकार’ पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार – खासदार संजय राऊत

नवी दिल्ली: राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील ‘खोके सरकार’ पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील, विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले आहेत. या भेटींमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीबद्दल चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. दिल्लीतही हा समन्वय दिसून आला. निवडणूक काळात जनतेसमोर जाताना एकमेकांचे हात धरून जायला हवे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसून येऊ नये. आघाडीतील कोणताही पक्ष मोठा, छोटा अथवा मधला असा भेद असता कामा नये, अशा अनुषंगाने दिल्ली दौऱ्यात चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी तीनही प्रमुख घटक पक्षांना सारखेच महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यात येईल. तसेच कोणताही महत्त्वाचा निर्णय एकाच पक्षाच्या नेत्याने जाहीर करायचा नाही. तसे झाल्यास घटक पक्षांमध्ये झालेल्या कराराचा तो भंग ठरेल, असेही राऊत म्हणाले. 

उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे देशाच्या पातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा ठरले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे केले असते तर काही जागा आणखी निवडून आले असते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आवश्यक असतो, असेही राऊत यांनी नमूद केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading