Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

प्रत्येकाविषयी आत्मियता हे मुखडे यांच्या स्वभावातील मोठेपण : उल्हास पवार


पुणे : पंडित पांडुरंग मुखडे यांनी संगतकार म्हणून गायकाला, कलाकाराला कायम सांभाळून घेतले. त्यांच्या तबलावादनात श्रावणसरींसारखा ऊन-पावसाचा खेळ जाणवतो. सुगम संगीताला लागणारी नजाकत तसेच शास्त्रीय गायन-नृत्याला पोषक अशी दमदार साथ हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य आहे. उस्तादांनी दिलेल्या ज्ञानाचे पंडित मुखडे यांनी सार्थक केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार यांनी काढले.

ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे यांच्या सांगीतिक कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुखडे परिवाराच्या वतीने ‌‘सुवर्णरंग‌’ कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पवार बोलत होते. कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे, प्रा. प्रकाश भोंडे, डॉ. जगदीश पाटील, महानंदा मुखडे, उल्हास पवार, आदिती बोरकर व्यासपीठावर होते.
पवार पुढे म्हणाले, मुखडे यांच्या घरात भजनाची परंपरा आहे. यातून त्यांना तालाचे आकर्षण निर्माण झाले. भजनाला साथ करता करता मुखडे यांनी तबलावादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत याचे कौतुक आहे. मुखडे यांच्यामुळे त्यांच्या लातूर जवळील मूळ गावातील मंदिरात अनेक थोर कलाकारांची हजेरी लागली आणि छोट्याश्या गावातील लोकांना उत्तम कलाकारांचे सादरीकरण, संगीत नाटके यांचा आनंद घेता आला.
सुरुवातीच्या काळात संगीत नाटकांच्या ओढीने मी भरत नाट्य मंदिरात अनेकदा बिना तिकिट येत होतो. तेव्हा एकदा डोअर किपरने आपल्याला रंगेहाथ पकडले आणि हाताला धरून बाहेर काढले ही आठवण सांगून पंडित मुखडे म्हणाले, आज त्याच भरत नाट्य मंदिरात मुख्य दरवाजातून मानाने येऊ शकतो इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला खूप स्नेह दिला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले, लहानश्या गावातून आलेल्या व्यक्तीने सूर-तालाचा ध्यास घेऊन आपल्या सांगीतिक कारकिर्दीची पन्नास वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली हे खूप कौतुकास्पद आहे. पंडित मुखडे यांनी आपल्या तबला वादनातून तालाचे साम्राज्यच उभे केले आहे. त्यांच्या आयुष्यातील यशाचा हा टप्पा खूप आनंददायी आहे. त्यांच्या स्वभावातील स्थैर्य आणि शांती यामुळे ते महान कलाकार असूनही कायम जमिनीवर आहेत.

मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले. मानपत्राचे लिखाण वलय मुळगुंद यांचे होते. तर आभार संजय डोळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाची मैफल रंगली. त्यांना पांडुरंग मुखडे (तबला) आणि उदय कुलकर्णी (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading