अन्यथा सर्व विधानसभा मतदासंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू; मुस्लिम समाजाचा इशारा
सोलापूर: सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदासंघात मुस्लिम समाजाचा उमेदवार द्या, अन्यथा जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदासंघातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पाडू, असा इशारा मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना दिला आहे.
शहर काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शहराध्यक्ष नरोटे यांची भेट घेऊन शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी केली. यावेळी नरोटे यांनी देखील, काँग्रेस भवनात बसून सर्व उमेदवार पाडण्याच्या वल्गना करू नका, असे पठाण यांना सुनावले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व ११ मतदारसंघांची माहिती मागितली आहे. त्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळेल आणि तिथे कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत, असे नरोटे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदासंघात काँग्रेस, ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर ३ जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी शहर मध्य मतदारसंघ सोडावा, अशी कम्युनिस्ट पक्षाची अपेक्षा आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसैय्या आडम मास्तर यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, अशी पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.
