पुण्याच्या अपूर्वा शेवडे व वरदा लाल्ये ठरल्या राष्ट्रीय पातळीवरील भरतनाट्यम स्पर्धेच्या विजेत्या
पुणे : पुण्याच्या अपूर्वा शेवडे व वरदा लाल्ये या भरतनाट्यम नृत्यांगनांनी राष्ट्रीय पातळीवरील भरतनाट्यम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, युनेस्को संलग्न, पुणे यांच्या तर्फे या राष्ट्रीय पातळीवर प्रायोगिक कलांच्या स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये भरतनाट्यम स्पर्धेमध्ये अपूर्वा शेवडे व वरदा लाल्ये यांना ज्युनिअर द्विकल विभागात प्रथम पारितोषिक पटकाविले.
सदर स्पर्धेसाठी भारतभरातून तब्बल ४ हजारांहून अधिक स्पर्धक नृत्यांगनांनी आपला सहभाग नोंदविला होता. अपूर्वा शेवडे व वरदा लाल्ये या दोघी बालशिक्षण मंदिर शाळेतील विद्यार्थीनी असून गेली १० वर्षे त्या भरतनाट्यम गुरू स्नेहल फाटक – कळमकर यांच्या स्नेहललित कला केंद्र या संस्थेत भरतनाट्यमचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहेत.
या स्पर्धेमध्ये या दोघींनी हंसध्वनी रागातील ‘पुष्पांजली’ आणि रागमालिकेतील ‘गणपती शब्दम्’ या रचना सादर केल्या. यावेळी त्यांनी सादर केलेल्या तालबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांची आणि परिक्षकांची मने जिंकली. या पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनींची निवड दुबई येथे अशाच प्रकारे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देखील झाली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हे द्विकल सादरीकरण दुबई येथे देखील होईल.
