एल अँड टी फायनान्स लि ची सुरक्षित वित्तपुरवठा पर्यायांसाठी फोनपेबरोबर भागीदारी
पुणे: देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वित्तीय सेवा आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रदान करणाऱ्या फोनपे या भारतातील आघाडीच्या फिनटेक कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारींतर्गत आर्थिक उत्पादनांची श्रेणी आणखी विस्तृत केली जाणार आहे, त्याचबरोबर घर तसेच दुचाकीच्या खरेदीसाठी ग्राहकांना सुरक्षित कर्जपुरवठा करणे, हे दोन्ही कंपन्यांचे या धोरणात्मक भागीदारीमागील उद्दिष्ट आहे.
घर आणि वाहनांच्या खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचा पर्याय शोधत असणाऱ्या ग्राहकांना हाऊसिंग आणि टू-व्हीलरसाठी असलेले वित्त पर्याय आणखी सक्षम केले जाणार आहेत. एल अँड टी फायनान्सच्या ‘कमप्लीट होम लोन’ योजनेसह कर्जदार त्यांच्या घराच्या अंतर्गत सजावटीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘होम डेकोर फायनान्स’चा लाभ घेऊ शकतील. तसेच कंपनीच्या ‘डिजिटाइज्ड प्रक्रियेचा’ अनुभवही घेऊ शकतील. याचबरोबर त्यांना या प्रक्रियेत येणाऱ्या समस्या ते ‘डेडीकेटेड रिलेशनशिप मॅनेजर’ च्या सहकार्याने सोडवू शकतील. कर्जदार आता एलटीएफच्या विविध वित्तीय पर्यायांची चाचपणी करत त्यांना हवा असलेल्या पर्याय निवडू शकतील. यामुळे ग्राहकांना त्यांची आर्थिक धोरणे आणखी अनुकूल करणे शक्य होणार आहे. शिवाय, गृह आणि दुचाकी खरेदीसाठी एलटीएफ देत असलेल्या वित्तपुरवठा पर्यायांमुळे कर्जदार ८.६५ टक्क्यांपासून सुरू होणारे स्पर्धात्मक व्याजदर तसेच ३० वर्षांपर्यंतच्या परतफेडीच्या कालावधीसाठी सुलभ वित्तपुरवठा सहज मिळवू शकतील.
फोनपेबरोबरील भागीदारीबाबत टिप्पणी करताना एलटीएफच्या अर्बन फायनान्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गरयाली म्हणाले, फोनपेसोबतची आमची भागीदारी देशभरातील ग्राहकांना नाविन्यपूर्ण आर्थिक सेवा प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. फोनपेचा आर्थिक विश्वातील सखोल विस्तार आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर त्याचबरोबर विश्वासार्ह वित्तीय पर्याय प्रदान करण्यात एल अँड टी फायनान्सचे असलेले कौशल्य यांचा वापर करून कर्ज पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे, हे या धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर आर्थिक समावेशकतेला गती दिली जात आहे. या भागीदारीमुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की, कर्ज वितरणाच्या क्षेत्रात एलटीएफ आणि फोनपे नवीन मापदंड प्रस्थापित करत असून सुविधा, प्रवेशयोग्यता आणि ग्राहकांच्या समाधानाला नवीन परिभाषा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत.”
फोनपे लेंडिंगचे सीईओ हेमंत गाला म्हणाले, ही भागीदारी आम्हाला फोनपेचे तांत्रिक कौशल्य आणि एल अँड टी फायनान्सची कर्ज वितरणात असलेल्या विश्वासार्ह अनुभवाच्या फायद्यासह ५३५ दशलक्षपेक्षा अधिक ग्राहकांची विस्तृत संख्या या सर्वांना एकत्र जोडण्याची संधी देते. त्यातून आमच्या वापरकर्त्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच मंचावर सुरक्षित असे कर्जाचे पर्याय निवडण्याची संधी मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की, कर्ज वितरण अर्थप्रणालीशी जोडल्या गेलेल्या ग्राहकांसाठी सुरक्षित कर्ज योजनारुपी अनुभवामध्ये क्रांती घडवून आणण्याची ही उत्तम वेळ आहे.”
एलटीएफने आतापर्यंतचे उच्चांकी तिमाही कर्ज वितरण केलेले असून ते २,५१३ कोटी रुपयांवर पोहचले आहे. घरखरेदी आणि मालमत्ता व्यवसायाआधारे कर्ज या प्रकारात वित्तीय वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत (Q4FY24) कंपनीने वार्षिक ७० टक्के वाढ साध्य केली आहे. विविध प्रदेशात आपले अस्तित्व वाढविणे, सक्षम असे डीएसए तसेच विविध वितरण प्रणालींसोबत भागीदारी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी राबविलेल्या धोरणात्मक उपायांद्वारे व्यवसायात निरंतर गती राखत कंपनीने या विभागातील वाढीला आणखी वेग दिलेला आहे.
एलटीएफने २०२४ च्या चौथ्या तिमाहीत दुचाकी कर्ज व्यवसायात २,५०२ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केलेले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत १,७२७ कोटी रुपयांच्या वितरण्याच्या तुलनेत त्यात यंदा ४५ टक्के वाढ झालेली आहे. विविध बाजारपेठांत अधिकाधिक खोलवर प्रवेश, ग्राहकांसाठी मूल्यनिर्मितीवर आपले लक्ष केंद्रीत ठेवणे आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी पसंतीचे डीलर / ओईएमबरोबर सहकार्याचे संबंध आणखी दृढ करत या विभागात आपल्या व्यवसाय वाढीला कंपनीने आणखी पाठबळ दिलेले आहे. वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत सखोल आणि नवनवीन सहकार्यातून प्राइम आणि ईव्ही सेगमेंटमध्ये अधिकाधिक व्यवसाय वाढीवर एलटीएफ नेहमी आपले लक्ष केंद्रित करते.
