‘कला स्पंदन आर्ट फेअरच्या माध्यमातून कलाभिव्यक्तीला मिळाले व्यासपीठ’
कला क्षेत्रात आपल्या देशात असलेले वैविध्य अनुभविण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी या आर्ट फेअरच्या निमित्ताने पुणेकर कलारसिकांना उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘इंडियन आर्ट प्रमोटर्स’ यांच्या वतीने आयोजित ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय अतिथी म्हणून ऑलिव्हिया फर्नांडिस, आर्टगॅलरी तज्ज्ञ अजय चांडक, ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी, रवीन बार तसेच आयोजक सुदीप चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन शनिवारी आणि रविवारी (२६ मे पर्यंत), एरंडवणे येथील वकील नगर, डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान सर्वांसाठी विनामूल खुले राहणार आहे.
महाराज कुमार श्रीमंत महाराज रोहितरावराजे देशमुख पवार पुढे म्हणाले, “ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही सर्वश्रेष्ठ कलाभिव्यक्ती आहे. त्याचीच निर्मिती असणाऱ्या मनुष्याने विविध माध्यमांतून या सृष्टीत पुन्हा कलानिर्मिती केली आहे, करत आहेत, यापुढेही करत राहतील. त्यातून कलानिर्मितीची परंपरा सुरू राहील. आपल्या देशाला अशा कलेची दीर्घ परंपरा आहे. तो वारसा जपणारे, पुढे नेणारे अनेक कलाकार या प्रदर्शनातून रसिकांना आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून भेटतील’.
डॉ. ऑलिव्हिया फर्नांडिस म्हणाल्या, “कलानिर्मिती हा सुंदर अनुभव असतो. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. तेव्हा जगभरातील कलेचे दर्शन घडते. पण मनात आपल्या भारतीय कलापरंपरेचे प्रेम जागृत असते. कला स्पंदन आर्ट फेअरच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील कलांचे एकत्रित दर्शन घडते आहे, याचा आनंद वाटतो.”
कला स्पंदन आर्ट फेअरचे पुण्यातील हे सलग दुसरे वर्षे असल्याची माहिती इंडियन आर्ट प्रमोटर्सचे संस्थापक आणि आयोजक सुदीप चक्रवर्ती यांनी याप्रसंगी दिली. ते पुढे म्हणाले, “कला स्पंदन आर्ट फेअर हे देशातील प्रमुख कला प्रदर्शनांपैकी एक असून समकालीन कलेसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनामध्ये पुणेकरांना जागतिक दर्जाची कला पाहता आणि अनुभविता येईल. तसेच प्रदर्शनामध्ये सहभागी कलाकार, कलातज्ञ यांच्याशी पुणेकरांना थेट संवाद साधता येईल,”. रथिन दत्ता यांनी सूत्रसंचालन केले तर स्पीड आर्टिस्ट रबीन बार यांनी उद्घाटनसत्रातच मान्यवरांसमोर अल्पावधीत चित्रकृती सादर करून दाद मिळवली.
या कला प्रदर्शनामध्ये व्यावसायिक आणि हौशी कलाकारांनी साकारलेल्या अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज, अलकोहोल इंक आर्ट, वॉटर, ऑईल, अॅक्रॅलिक आणि मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझिन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट, पारंपारिक कला पुणेकरांना अनुभविता येईल. देशभरातील १५० कलाकार आणि कलादालनांतर्फे तब्बल १५०० हून अधिक कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या आहेत.
