शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पुणे, दि. १०: शिरुर लोकसभा मतदासंघात सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावे; आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मतदानाच्यादृष्टीने मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री.मोरे यांनी दिली.
शिरुर मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ५८६ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणदेखील वेळोवेळी दिले जात आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात २५ लाख ३९ हजार मतदार
शिरुर लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ३९ हजार ७०२ मतदार असून यामध्ये १३ लाख ३६ हजार ८२० पुरूष मतदार, १२ लाख २ हजार ६७९ महिला मतदार आणि २०३ तृतीयपंथी मतदार आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३ लाख १२ हजार २०५ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५९ हजार ८३० पुरुष, १ लाख ५२ हजार ३७१ महिला तर ४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख २ हजार १०१ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५४ हजार ५३५ पुरुष, १ लाख ४७ हजार ५५९ महिला तर ७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५२ हजार ६३४ मतदार असून त्यामध्ये १ लाख ८३ हजार ५७ पुरुष, १ लाख ६९ हजार ५६७ महिला तर १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
शिरुर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ३९ हजार २७६ मतदार असून त्यामध्ये २ लाख २९ हजार ४७२ पुरुष, २ लाख ९ हजार ७८४ महिला तर २० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ५१ हजार ५८२ मतदार असून त्यामध्ये ३ लाख २ हजार ७५ पुरुष, २ लाख ४९ हजार ४१६ महिला तर ९१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ८१ हजार ९०४ मतदार असून त्यामध्ये ३ लाख ७ हजार ८५१ पुरुष, २ लाख ७३ हजार ९८२ महिला तर ७१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
एकूण १६ लाख मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वाटप
शिरुर मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण १६ लाख ३७ हजार ८४२ मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. निवडणूक कर्मचारी शहरी तसेच ग्रामीण भागात जावून मतदारांना मतदार ओळख चिठ्ठी देत असून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
जुन्नर विधानसभा मतदारंसघात २ लाख ५६ हजार ७९८ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारंसघात २ लाख ३१ हजार ६७५, खेड आळंदी विधानसभा मतदारंसघात २ लाख ३१ हजार ६०२, शिरुर विधानसभा मतदारंसघात ३ लाख १० हजार १५२, भोसरी विधानसभा मतदारंसघात ३ लाख ८९ हजार ९१९ तर हडपसर विधानसभा मतदारंसघात ३ लाख ३५ हजार ३४५ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे.
मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल. मतदार ओळख चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी याकामी आपल्या दारापर्यंत येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदार सहायता कक्षाद्वारे मार्गदर्शन
मतदारांच्या मदतीसाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारांना माहितीसाठी मतदार मदत कक्षातीत कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात स्वप्नील दप्तरे ८६६८९८७०५९, सचिन देशपांडे ८७९६७ ०९८४८, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले ९३७३७६६४८३, शुभम गाडेकर ७९७२२१०१६६, खेड आळंदी मतदारसंघात मयूर तनपुरे ८३०८२१२९९०, दत्तात्रय गारगोटे ९०७५३०५६२०, शिरूर विधानसभा मतदारसंघात सदाशिव सावंत ७०२०८७५५४५, जिजा अहिर ९९२१६७२११९, ज्ञानेश्वर अजबे ९११९५४१२६३, महेश आढाव ९३७२१३५१५१,आकाश डोईफोडे ९९७५५६८१८१, प्रणव पारगे ८६०५१४०१२३, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे ७७४१९०७३५६, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बर्डे ८४४६५१६८६४ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. मोरे यांनी केले आहे.
०००
