विद्यापीठ निर्माण करणे, हा विकास नाही का ? – राज्याचे माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांचा पुन्हा सवाल
पुणे : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा महाराष्ट्रात आणि ते ही क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या पुण्यात निर्माण करणे हा विकास नाही का प्रश्न माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी बुधवारी प्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये पुन्हा उपस्थित केला.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरच्या प्रचारासाठी सुनील केदार सध्या पुण्यात आहेत. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी क्रीडा विद्यापीठ उभारणीविषयी प्रश्न उपस्थित केले होते. आज नव्याने क्रीडा पत्रकारांशी गप्पा मारताना केदार यांनी क्रीडा विद्यापीठाविषयी आपली मते मांडली.
मी विदर्भाचा असूनही पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्याचा आग्रह धरला. या संदर्भात विधानसभेत कायदाही मंजूर करून घेतला आणि प्रकल्प धसास लावण्यासाठी वेगाने सुरुवात केली होती. कुलगुरू नियुक्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने सरकार पडले आणि ही योजना सरकारी बास्तानात गुंडाळली गेली असा आरोपही श्री. केदार यांनी केला.
युजीसीकडून मास्टर्स, डीग्री कोर्सेस मंजूर करून आणले. यावर तज्ञ नियुक्ती केली. इमारती आणि पायाभुत सुविधा बालेवाडी येथे असल्याने केवळ वर्ग सुरू होणे बाकी होते. असे असताना राज्यातील सरकार बदलले. तेव्हापासून आजपर्यंत या विद्यापीठाची फाईल कुठे अडकली काहीच माहिती नाही. विकासाच्या गप्पा मारणार्या सध्याचे राज्यकर्ते यांनी या विद्यापीठाला खोडा घालण्याचे काम केले आहे. राज्यातील नवीन पिढीचे नुकसान झाले याचा पुनरुच्चारही श्री केदार यांनी या वेळी केला.
क्रीडा विद्यापीठाचे काम पूर्ण झाले होते. सर्व मान्यता घेवून केवळ वर्ग सुरू करणे बाकी असताना राज्यातील सरकार बदलले आणि क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला. पुण्यात सर्व आराखडा तयार असताना हे क्रीडा विद्यापीठ अचानक छत्रपती संभाजीनगर येथे कसे गेले या सगळ्याची उत्तरे सत्ताधारी सरकारने द्यावीत अशी मागणीही केदार यांनी केली. त्याचबरोबर आमचे सरकार आल्यावर पुन्हा एकदा क्रीडा विद्यापीठ पुण्यातच सुरु करण्याचा आमचा निर्धार असले असे आश्वासनही केदार यांनी दिले.
