Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शाश्वत जीवनशैलीसंदर्भात जनजागृती करीत पुण्यातील प्रणती श्रॉफ – मुनोत यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आपला ४० वा वाढदिवस

पुणे  : निरोगी आणि शाश्वत जीवनशैलीसंदर्भात जनजागृती व्हावी, त्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना कळावेत आणि त्यांनी देखील ही जीवनशैली अंगीकारावी या उद्देशाने पुण्यातील प्रणती श्रॉफ मुनोत यांनी आपला ४० वा वाढदिवस ट्रायथलॉन पूर्ण करीत अनोख्या पद्धतीने साजरा करीत एक उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

विशेष म्हणजे प्रणती यांच्यासोबत पुण्यातील नातेवाईक- मित्र मंडळी यांसोबतच ७ राज्यातील, व ४ देशांमधील तब्बल १०० नातेवाईक – मित्र मंडळी यांनी ही चालणे, सायकलिंग आणि पोहणे अशी ट्रायथलॉन पूर्ण केली. ज्यामध्ये पुण्यासोबतच सिंगापूर, अमेरिका यांसारख्या ४ देशांतील नागरीक सहभागी झाले होते.

काल (बुधवार दि २४ एप्रिल) रोजी सकाळी ५.३० ते ९ वाजे दरम्यान बोट क्लब येथे ही ट्रायथलॉन संपन्न झाली. यामध्ये सहभागी झालेल्यांनी ४० किमी सायकल चालविणे, ४ किमी धावणे आणि ४०० मीटर पोहणे अशा तीन गोष्टी पूर्ण केल्या. उपक्रमात सहभागी झालेल्या १०० नागरीकांनी तब्बल ४० हजार कॅलरीज खर्च केल्या हे विशेष.

पाच वर्षाच्या लहान मुला मुलींसोबतच ८९ वर्षांचे आजी आजोबा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हे विशेष. स्वत:पासून सुरु झालेले हे प्रयत्न या उपक्रमाद्वारे आज १०० हून अधिक जणांपर्यंत पोहोचल्याचा आनंद यावेळी प्रणती यांनी व्यक्त केला.

प्रणती या सस्टेन अँड सेव्ह या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून शाश्वत व निरोगी जीवनशैलीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेत आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. याद्वारे जीवनशैलीतील काही महत्त्वाच्या बदलांमुळे आपण कशा पद्धतीने सकारात्मक बदल घडवू शकतो याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले.

केवळ शारीरिक व्यायामप्रकार नव्हे तर पर्यावरणासंदर्भातील बांधीलकी जागृती व्हावी, शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व समाजाला उमजावे आणि ही शाश्वत जीवनशैली अधिक चांगली करण्यासाठी समाजाने प्रयत्न करावेत, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रणती यांनी नमूद केले.

केवळ शाश्वत जीवनशैली बद्दल न बोलता त्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यासोबतच त्याचे योग्य अनुकरण कसे करावे हे मला इतरांपर्यंत पोहोचवायचे होते. शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात अगदी लहान बदल करून, आपण सर्वजण कशा प्रकारे अधिक शाश्वत भविष्यासाठी योगदान देऊ शकतो याचे प्रात्यक्षिक मला या कृतीमधून द्यायचे होते, असेही प्रणती यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading