Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
पुणे : आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठं नाव आहे. तसेच अतुल देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. देशमुख यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपला आणि पर्यायाने महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली
अतुल देशमुख यावेळी म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून मी खेडमध्ये भाजपच काम करत होतो. मात्र गेल्या अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानाने लढायचं, पवारांमागे उभ राहायचं. आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील कधी पक्ष प्रवेश करणार?
गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रेवेश करणार अशा चर्चा आहेत. तसेच आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील कधी पक्ष प्रवेश करणार? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर खुद्द शरद पवारांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, दोन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थितीत असतील.
