Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

काळानुरूप जे बदल स्वीकारतात, तेच ऑर्बिट भेदू शकतात – डॉ. आनंद देशपांडे

पुणे : ‘उद्योग विस्तारण्याच्या आणि वर्धिष्णु होण्याच्या अनेक शक्यता असतात. पण त्यासाठी सुरवातीच्या टप्प्यावर यशस्वी ठरलेले प्रारूप (माॅडेल) जसेच्या तसे कामी येत नाही. काळानुरूप जे उद्योजक बदल स्वीकारतात, तेच ऑर्बिट भेदू शकतात आणि प्रगती करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक आणि पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. ‘युवा उद्योजकांनी काळाची चाहूल घेत, बदलांना सामोरे जावे, आपल्या धोरणांमध्ये लवचिकता ठेवावी’, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘द सिनेट टॉक शो’ अंतर्गत प्रसिद्ध लेखक, संवादक आणि द सिनेट बिझनेस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत वर्तक यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. डी पी रस्त्यावरील वर्तक हेरीटेज येथे असलेल्या द सिनेट बिझिनेस सेंटर या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विक्रांत वर्तक लिखित ‘५० डायलेमाज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक व आयोजक विक्रांत वर्तक, चितळे ग्रुपचे संजय चितळे, इंद्रनील चितळे तसेच शारंगधर फार्मास्युटिकल्सचे डॉ. जयंत अभ्यंकर उपस्थित होते. बंधन म्युच्युअल फंडचे नीरज कपूर, बीएमडब्ल्यू बव्हेरिया मोटर्सच्या ख्याती निगम यांनीही उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

डॉ. देशपांडे यांनी पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या उभारणीची, तेव्हाच्या देशातील उद्योगांविषयीच्या मानसिकतेची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. ‘पर्सिस्टंटच्या स्थापनाकाळात साॅफ्टवेअरची निर्यात ही नवी संकल्पना होती. तो काळ नव्या संकल्पना साकारण्याचा होता आणि पर्सिस्टंट तेव्हा योग्यकाळात योग्य ठिकाणी होती, असे डॉ. देशपांडे म्हणाले.

‘नव्या ब्रॅंडला सर्वांत प्रथम दर्जा आणि विश्वासार्हता निर्माण करावी लागते, याची जाणीव असल्याने पर्सिस्टंटमध्ये तोच मंत्र जपत आम्ही सातत्याने प्रगती करत गेलो आणि कमी काळात आम्ही जगभरातील ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलो’, असेही त्यांनी नमूद केले.

व्यवसायात स्थिरावणे, ही संकल्पना कालबाह्य झाली असून, प्रगती करत जाणे, विकासाचा स्तर उंचावत नेणे, ही व्यावसायिक यशाची मानके आहेत असे सांगत देशपांडे पुढे म्हणाले की, हे करीत असताना तोच तो पणा टाळला पाहिजे. अनेकदा एखादे माॅडेल यशस्वी ठरले, की त्याचीच पुनरावृत्ती करण्याकडे कल जातो. पण बहुतेक वेळा ही पुनरावृत्ती फसते कारण विशिष्ट माॅडेल विशिष्ट काळात, परिस्थितीत यशस्वी झालेले असते. काळ सतत पुढे जात असतो. तंत्रज्ञानासह यंत्रसामग्री, मनुष्यबळ, योजकता, बाजारपेठा, ग्राहकांची मानसिकता यात सतत बदल होत असतात. हे बदल अधिक गतीने होतात, त्यामुळे ठराविक ऑर्बिटमध्ये व्यवसाय अडकून पडण्याची शक्यता असते. ती कक्षा भेदण्यासाठी व्यावसायिकांनी धोरणांमध्ये, कार्यपद्धतीमध्ये योग्य ती लवचिकता राखणे गरजेचे असते.”

कुठलीही कंपनी, उद्योग मोठा म्हणून जन्माला येत नाही. कधीतरी तो लहानच असतो. संस्थापक आणि व्यवस्थापकीय टीम, यांच्यातील समविचारानेच व्यवसाय वाढत असतो याकडे यांनी लक्ष वेधले.

त्यामुळे संस्थापकांनी स्मरणरम्य काळातच न राहता, भविष्याकडे दृष्टी ठेवली पाहिजे. व्यावसायिक यशाची नवी वर्तुळे गाठण्यासाठी उत्तम व्यवस्थापन, प्रशासन, बाजारपेठांचा सातत्याने अभ्यास, ग्राहकांशी थेaट संपर्क, प्रगतीसाठी उत्सुक असलेले नवविचारांचे कुशल युवा मनुष्यबळ संस्थापकांनी सतत शोधले पाहिजे आणि जोडले पाहिजे, असेही डॉ. देशपांडे म्हणाले.

‘प्रगतीचा आलेख स्थिर न राहता उंचावत नेला पाहिजे, नाविन्यपूर्ण योजना राबविल्या पाहिजेत, आवश्यक तेव्हा धोरणे बदलली पाहिजेत, सतत नवे बदल स्वीकारत स्वतःला तपासत राहिले पाहिजे, व्यावसायिक पुनर्विचार केला पाहिजे, संस्थापक या नात्याने असलेले भावनिक नाते योग्य वेळी बाजूला ठेवून व्यावहारिक तथ्ये समजून घेतली पाहिजेत, व्यवसायात ‘मी पणा’ बाजूला ठेवून ‘आपण’ हा मंत्र आचरला पाहिजे’, असेही देशपांडे यांनी सांगितले.
विक्रांत वर्तक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading