Monday, October 12, 2026
Latest NewsPUNE

वैष्णव होणं ही खूप मोठी गोष्ट – ह.भ.प. डॉ. विजय महाराज जगताप

पुणे : मेघा व जे व्ही इंगळे यांच्या वतीने ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा वैष्णव पुरस्कार यंदा प्रख्यात वारकरी कीर्तनकार व ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ञ ह.भ.प. डॉ. विजय महराज जगताप यांना प्रदान करण्यात आला. रूपये २१ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व बालशिक्षण शाळेच्या एमइएस सभागृहात संपन्न झालेल्या ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मेघा व जे व्ही इंगळे, सुधाकर चव्हाण व श्रीनिवास जोशी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ह.भ.प. डॉ. विजय महाराज जगताप म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात पुरस्कार प्राप्त होणं शक्य असतं, पण ‘वैष्णव’ होणं शक्य नसतं. वैष्णव होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शाळेत असताना वर्गात मित्रांसोबत भांडण झाल्यावर आईने पहिल्यांदा आपल्याला “भांडायचं नाही, आपण वैष्णव आहोत” असे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत ते म्हणाले की, वैष्णवाचा धर्म म्हणजे विश्वमय जग असून, “वैष्णव तो जया अवघी देवावरी माया” म्हणजेच सृष्टी, जग, प्रपंच आणि देहाचे तादात्म्य सुद्धा ज्याला सोडता आलं आणि फक्त भगवंतावर प्रीती करता आली, तोच खरा वैष्णव होय.

आपल्या सत्गुरू परंपरा श्रीमद सद्गुरु पांडुरंगनाथ महाराज जगताप यांच्या परंपरेचा वारसा पुढे चालवताना, ‘वैष्णव’ होता यावे, एवढेच भगवंताकडे आयुष्यभर मागणं असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित ‘नामाचा गजर’ या संत रचना व अभंग यावर आधारित सांगीतिक कार्यक्रमात प्रख्यात कलाकारांनी विविध संताचे अभंग सादर केले. यामध्ये शाश्वती व पंडित सुधाकर चव्हाण यांनी जय जय रामकृष्ण हरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि विठ्ठला रे, कंठ आळविता फुटला रे तर विराज व पंडीत श्रीनिवास जोशी यांनी नामाचा गजर गर्जे भीमातीर, अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा, कान्होबा तुझी घोंगडी चांगली या रचना सादर केल्या. पंडित कल्याणजी गायकवाड यांनी वाट ही चालावी पंढरीची, मी गातो नाचतो आनंदे, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण आदी रचना रसिकांसमोर सादर केल्या. या कार्यक्रमात गायकांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पांडुरंग पवार, पखवाजवर गंभीर महाराज अवचार आणि टाळावर मकरंद बादरायणी यांनी साथसंगत केली.

ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या वैष्णव पुरस्काराचे हे दहावे वर्ष होते. याआधी पं. शौनक अभिषेकी, आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, पं. श्रीनिवास जोशी, पं. हेमंत पेंडसे, प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते आणि गायक, संगीतकार डॉ. भरत बलवल्ली व पं. रघुनाथ खंडाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading