Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

अमृतांजली फेस्टिवल ऑफ क्लासिकल डान्स-२०२४- भरतनाट्यममधील दिग्गजांच्या सादरीकरणाने सजलेली जादूई संध्या

पुणे : अमृतांजली फेस्टिवल ऑफ क्लासिकल डान्सची पुणे येथे भव्‍य सांगता झाली. निपुण आणि प्रख्यात कलावंतांच्या तीन मंत्रमुग्ध करणाऱ्या भरतनाट्यम सादरीकरणांची मेजवानी पुणेकरांना प्राप्त झाली. महोत्सवाच्या निमंत्रक, समन्वयक आणि क्युरेटर डॉ. शशीकला रवि दरवर्षी विमाननगरमधील अत्याधुनिक अमृतांजली डान्स स्टुडिओमध्ये अमृतांजली नृत्य महोत्सवाचे आयोजन करतात. डॉ. रवि स्वत: निपुण भरतनाट्यम कलावंत आहेत, त्यांनी दिग्गज गुरूंच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आहे. त्या नृत्यदिग्दर्शनही करतात. भरतनाट्यम तसेच भरताच्या अन्य शास्त्रीय नृत्यप्रकारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्या काम करतात. दरवर्षी अमृतांजली फेस्टिवल ऑफ क्लासिकल डान्समध्ये कला सादर करण्यासाठी तसेच कार्यशाळा घेण्यासाठी त्या प्रख्यात कलावंत व गुरूंना आमंत्रित करतात. याशिवाय, सर्व शास्त्रीय नृत्यप्रकारांतील नवोदित कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी डॉ. रवि नोव्हेंबरमध्ये अमृतांजली नृत्योत्सवाचे आयोजन करतात.

या वर्षी ५ आणि ६ एप्रिल असे दोन दिवस त्यांनी चेन्नईतील कलाइमामानी रोजा कन्नन यांना आमंत्रित करून भरतनाट्यम कार्यशाळेचे आयोजन केले होते. पुण्यातील नृत्य कलावंत या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मभूषण दिवंगत कलानिधी नारायण यांनी नृत्यदिग्दर्शित केलेली दोन अभिनय पद्मे  श्रीमती रोजा कन्नन यांनी उत्साही विद्यार्थ्यांना शिकवली.

७ एप्रिल रोजी डॉ. शशिकला रवि यांनी प्रमुख पाहुण्या गुरू शमा भाटे, अन्य प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षक यांचे स्वागत केले. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते आणि सादरीकरणे पूर्ण होईपर्यंत तीन तास ते तसेच भरलेले राहिले.

डॉ. रवि यांनी ओमकारकारिणीचा शोध सर्वांपुढे सादर करून सादरीकरणांची सुरुवात केली. ओमकारकारिणी ही विश्वाची दैवी माता सर्वव्यापी स्त्री ऊर्जेचा स्रोत समजली जाते. डॉ. रवि यांनी ज्या कौशल्याने नृत्य सादर केले, ते बघून प्रेक्षक अचंबित झाले. निर्माती, जतनकर्ती व संहारक असे मातेचे अनेक वैविध्यपूर्ण गुण उत्तम नृत्यदिग्दर्शनाद्वारे तसेच डॉ. रवि यांच्या अप्रतिम सादरीकरणाद्वारे व्यक्त केले गेले. सूक्ष्म तपशिलांनी युक्त असा अभिनय आणि जटील पदन्यास ही त्यांच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये होती.

त्यानंतर श्रीमती रोजा कन्नन आणि त्यांच्या शिष्या सहाना सेल्वगणेश यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाचे नाव मॅजिक ऑफ मरगम असे होते. गुरू रोजा कन्नन यांनी पदवर्णन मोहमाना आणि पद्म सखी प्राणातील उत्कट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अखेरचे साजरीकरण ‘परंपरा’तर्फे झाले. गुरू सुचेता भिडे चापेकर आणि त्यांच्या कन्या व शिष्या अरुंधती पटवर्धन तसेच नात सागरिका पटवर्धन यांनी नृत्य सादर केले. त्यांनी एकत्रितपणे काही खिळवून ठेवणारी सादरीकरणे दिली. तक्रार करणारी गोपिका, लोणी चोरणारा अवखळ कृष्ण आणि गोपिकेहून अधिक विश्वास आपल्या लाडक्या मुलावर ठेवणारी प्रेमळ आई यशोदा यांचे सुंदर चित्र त्यांनी नृत्याद्वारे उभे केले.  अलारिपू आणि शिवस्तुतीमध्ये या तिघींचा समन्वय उत्कृष्ट होता.

महोत्सवाची सांगता भैरवी रागातील भजनी ठेक्यातील ‘हे प्रभो’ या भजनाने झाली. गुरू सुचेता चापेकर यांनीच हे सादरीकरण केले. त्यानंतर आश्वासक, शांत व सुखद वातावरणात पडदा पडला.

ही संध्याकाळ खरोखर जादूई होती. पुण्याच्या प्रेक्षकांना अप्रतिम भरतनाट्यम सादरीकरणांद्वारे खिळवून ठेवण्याचे सर्व श्रेय डॉ. शशिकला रवि यांना जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading