भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रात कोणाला उमेदवारी?
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज (दि.2 ) पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह एकूण 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी यांना तर कॉँग्रेसच्या काळात देशाचे संरक्षण मंत्री असलेल्या ए. के. अॅ टनी यांच्या मुलाला भाजपने केरळ मधून उमेदवारी दिली आहे.
दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपने ही घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आजच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचे नाव नाही. मात्र महाराष्ट्र कॉँग्रेस मधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातील जौनपूर मधून तिकीट देण्यात आले आहे.
