Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

विषयाची थेट मांडणी ही लघुपट, माहितीपटांची खरी ताकद वीरेंद्र वळसंगकर यांचे मत

पुणे: कोणताही विषय थेटपणे आणि नेमक्या पद्धतीने मांडता येणे, ही लघुपट, माहितीपटांची खरी ताकद आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माते वीरेंद्र वळसंगकर यांनी व्यक्त केले. “लघुपट, माहितीपट तुलनेने कमी खर्चात तयार होतात, तसेच प्रभावीपणे आशय पोचवतात”, असेही ते म्हणाले.

आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. महोत्सवाचे संचालक अॅड चेतन गांधी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफडीसीचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा दोन दिवसीय महोत्सव प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. एकूण ४० लघुपट, माहितीपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले.

महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात ‘कॅप्सूल’ या लघुपटाने आणि ‘मिशन इम्पॉसिबल’ या माहितीपटाने प्रथम क्रमांक पटकावले. विजेत्या चमूला वीरेंद्र वळसंगकर यांच्या हस्ते आणि महोत्सव संचालक अॅड चेतन गांधी यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

वळसंगकर म्हणाले, “पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. यासाठीची व्यावसायिक आणि व्यावहारिक गणिते निराळी असतात. या सर्व प्रक्रियेत अनेकदा जे सांगायचे आहे त्याचा आत्मा हरवून जातो आणि ‘विकला जाईल असा माल’ टाकावा लागतो. याउलट लघुपट कमी गुंतवणुकीत तसेच कमी वेळात तयार करता येतात. ते थेट आशयाला भिडतात व प्रभावी ठरतात. माहितीपटात तर वास्तव दर्शनच मांडलेले असते. ते अधिक परिणामकारक आणि प्रेरणा देणारे असतात.”

‘जल, जंगल, जमीनविषयक अधिकार मिळवणारे देशातील पहिले गाव मी लघुपटातून मांडले, तेव्हा मी हा अनुभव घेतला. लघुपट, माहितीपटात प्रयोगशीलतेला अधिक वाव मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सव संचालक अॅड चेतन गांधी म्हणाले, “कोणत्याही विषयासंदर्भात जनजागृती करीत असताना चित्रपट, लघुपट आणि माहितीपट हे माध्यम कायमच प्रभावी ठरते. सर्जनशील आणि कल्पक युवा लेखक-दिग्दर्शक यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आरोग्य विषयावरील अनेक पैलूंवर या माध्यमातून ऊहापोह व्हावा, चर्चा व्हावी आणि आरोग्याशी संबंधित अनेकविध विषय मांडता यावेत या उद्देशाने पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने या आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवरील तब्बल ४० चित्रपट, लघुपट आणि माहितीपट महोत्सवा अंतर्गत सादर झाले, याचे समाधान वाटते,” मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘स्कूल सॅनिटेशन प्रोग्रॅम’ यशस्वीपणे राबविलेल्या पाच शाळांचा विशेष सन्मान वळसंगकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यात शाळांच्या मुख्याध्यापकांचा व समन्वयकांचा समावेश होता. माहितीपट व लघुपटांचे परीक्षण करणारे परीक्षक विनय जवळगीकर तसेच रश्मी आगरवाल यांचाही सन्मान करण्यात आला.

महोत्सवाच्या स्पर्धात्मक लघुपट विभागात शरपंजरी (दिग्दर्शक – डॉ. ओंकार हरिदास – दुसरा क्रमांक) तर ताजमहाल (दिग्दर्शक – प्रवीण खाडे – तिसरा क्रमांक) हे विजेते ठरले.

माहितीपट विभागात अंधार विसरलेली माणसं (दिग्दर्शक विक्रम बोलगवे, दुसरा क्रमांक) तर (दिग्दर्शक – अक्षय कदम, तिसरा क्रमांक) हे विजेते ठरले.लक्ष्मी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading