Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

१८ वा पुणे डिझाईन फेस्टिव्हल येत्या १ व २ मार्चला

पुणे  : असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) च्या वतीने येत्या शुक्रवार दि. १ मार्च आणि शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १८ व्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी या ठिकाणी हा महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय)च्या पुणे विभागाचे प्रमुख योगेश दांडेकर यांनी कळविली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना योगेश दांडेकर म्हणाले, “पुणे डिझाईन फेस्टिव्हल अर्थात पीडीएफचे हे १८ वे वर्ष असून ‘व्हर्सेस’ अर्थात डिझाईन क्षेत्रातील बहुआयामी विरोधाभास अशी या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. या दोन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईन या विषयात होत असलेले काम, डिझाईनचे आयाम, नजीकचे भविष्य, या क्षेत्रातील अनेकविध विषयांवर चर्चा, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले आहे.”

व्हर्सेस या संकल्पने अंतर्गत या महोत्सवात डिझाईनच्या दोन विभिन्न दृष्टीकोनांवर सारासार विचार करून चर्चा घडवून आणण्यासाठी तुलनात्मक अभ्यासाद्वारे डिझाईन हे एक टीम वर्क आहे यावर उहापोहा करण्यात येणार आहे, असेही दांडेकर यांनी नमूद केले.

शुक्रवार दि. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ‘व्हर्सेस’ या संकल्पनेवर आधारिक कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर सुप्रसिद्ध बिहेविअरल सायन्टिस्ट (वर्तवणूक शास्त्रज्ञ) मॅट वॉलर्ट यांच्या बीजभाषणाने महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी धोरणात्मक अनुभव असलेले डिझाईन विषयक सल्लागार सचिन बेहेरे त्यांच्याशी संवाद साधतील. यानंतर ‘सहानुभूती आणि नाविन्यता’ या विषयावर रिचरखा या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या संस्थापिका अमिता देशपांडे आणि डिझाईन उद्योजिका कादंबरी मिस्रा यांचे व्याख्यान होईल. स्टुडिओ एकसॉरसचे संस्थापक, ॲनिमेटर, प्रसिद्ध कला व चित्रपट दिग्दर्शक ई सुरेश आणि भारतीय कलाकार, इलस्ट्रेटर, ॲनिमेटर व कथाकार म्हणून ओळखले जाणारे ऍलन शॉ यांच्या पुस्तकांचे लोकार्पण देखील या महोत्सवात संपन्न होईल. यासोबतच ‘चित्रपट आणि कथाकथन’ या विषयावर सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्माते असलेले दिबाकर बॅनर्जी यांचे व्याख्यान पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य असेल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बंगळूरू येथील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापक – संचालिका डॉ गीता नारायणन यांचे बीजभाषण होईल. डॉ नारायणन यांनी डिझाईन क्षेत्रात शैक्षणिक संस्थांचे नवीन मॉडेल स्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

यानंतर ‘इग्नायटिंग इम्पॅक्ट’ या विषयावर आर्टीझन्स या संस्थेच्या संस्थापिका राधी पारेख आणि देशी वाणांचे जतन करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थितांना मार्गदर्शन करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या समारोप सत्रात कॉन्ट्रापंक्ट जपानचे अध्यक्ष आणि कॉन्ट्रापंक्ट डेन्मार्कचे संस्थापक भागीदार बीओ लिनमन यांच्या भाषणाने होईल. लिनमन यांना तब्बल १७ वेळा डॅनिश डिझाईन पारितोषिकाने आणि डिझाईन क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. यानंतर यावर्षीची ‘बॅटल ऑफ प्रोजेक्ट्स अवॉर्ड २०२४’ प्रदान करीत महोत्सवाचा समारोप होईल.

१८ व्या पुणे डिझाईन महोत्सवाचे औचित्य साधत असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २४ ते २९ फेब्रुवारी दरम्यान पुणे डिझाईन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे अनेक कार्यशाळा, कॅम्पस टूर्स, शहरातील डिझाईन क्षेत्राशी व्यक्तींना भेटण्याची संधी सहभागी नागरिकांना मिळणार आहे.

यामध्ये २० हून अधिक कार्यशाळा, १० हून अधिक ओपन हाऊस कार्यक्रम व कॅम्पस टूर्स, प्रात्यक्षिके, कार्यक्रम यांचा समावेश असेल. डिझाईनच्या विद्यार्थ्यांपासून ते उद्योजक, व्यावसायिक अशा सर्वांचा समावेश यामध्ये असणार असून यादरम्यान टायपोग्राफी डिझाईन, क्ले क्राफ्ट्स, फॅशन डिझाईन, कॅरेक्टर डिझाईन, ओरिगामी (पेपर क्राफ्ट्स), सस्टेनेबिलिटी, स्केचिंग आणि कॅलिग्राफी अशा विषयांवर चर्चा होणार होईल अशी माहिती देखील योगेश दांडेकर यांनी दिली. याशिवाय डिझाईन वॉक, बोर्ड गेम नाईट, ड्रम सर्कल, फोटो वॉक आणि टाईप फेस प्रदर्शन यांसारखे उपक्रम हे देखील महोत्सवाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतील, असेही दांडेकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading