आरोग्यविषयक गैरसमज दूर होण्यासाठी आरोग्य चित्रपट महोत्सव हे उत्तम व्यासपीठ – डॉ. अभिजीत वैद्य
पुणे : समाजात आरोग्याच्या संदर्भात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आढळतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी आरोग्य चित्रपट महोत्सव हे उत्तम व प्रभावी व्यासपीठ आहे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ व राष्ट्रीय आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ‘आरोग्य सेनेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी कार्यरत असताना अडाणी खेडुत उच्चशिक्षित पिढीपेक्षा अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते, असे निरीक्षणही डॉ. अभिजीत वैद्य यांनी नोंदवले.
आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. महोत्सवाचे संचालक अॅड चेतन गांधी, प्रसिद्ध उद्योजक सतीश कोंढाळकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा दोन दिवसीय महोत्सव संपन्न होत असून ४० लघुपट, माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
डॉ. वैद्य म्हणाले,’वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने समाजात आरोग्यविषयक अज्ञान आणि गैरसमजुती यांचे प्रमाण प्रचंड असल्याचे मी अनुभवले आहे. आरोग्याचा संबंध विज्ञानाशी असतोच, पण भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात आरोग्यविषयक जाणिवा जागृत करण्यासाठी आरोग्याशी संबंधित चित्रपट महोत्सव, हे उत्तम व्यासपीठ आहे. सर्पदंशापासून अवयवदानापर्यंत आणि स्मृतीभ्रंशापासून नैराश्यापर्यंत आरोग्याशी निगडित अनेक घटक या महोत्सवातील कलाकृतींनी मांडले आहेत. त्यामुळे समाजातील आरोग्यविषयक गैरसमज, अपप्रचार, विपरीत समजुती, अंधश्रद्धा दूर होण्यास साहाय्य मिळेल, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक अॅड चेतन गांधी यांनी केले. यावेळी नुजा देवधर, विनय जवळगीकर, सुखदा ख्रिस्ती, जयश्री देवधर आदी समीक्षकांचा डॉ. वैद्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘स्कूल सॅनिटेशन प्रोग्रॅम ‘ यशस्वीपणे राबविलेल्या पाच शाळांचा विशेष सन्मान डॉ. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालय, शिवाजीनगर, एच एच सी पी मुलींची प्रशाला, गगनगिरी प्राथमिक विद्यालय आणि गगनगिरी इंग्रजी माध्यम शाळा, कात्रज, कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूल या शाळांच्या मुख्याध्यापकांचा व समन्वयकांचा त्यात समावेश होता. ज्योती देडगे आणि अरुण पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
