Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण दिल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मराठा समाजातील 84 टक्के जनता ही मागास असून इंद्रा सहानी केस नुसार मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आज बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या विधेयकाला सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ना कोणाला धक्का ना कोणावर अन्याय, या तत्वाला धरून आज राज्य सरकार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देत आहे. मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाला ओबीसीमध्ये वर्ग करणे अयोग्य असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, 40 , 45 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. हे आरक्षण म्हणजे जरांगे पाटील आणि लाखों मराठा आंदोलकांचा विजय आहे. मी मराठा समाजाला शब्द दिला होता अन् मी माझा शब्द पाळला आहे. मला मुख्यमंत्री म्हणून कोणत्या एका जातीचा विचार करता येत नाही. त्यामुळे ना कोणाला धक्का ना कोणावर अन्याय, या तत्वाला धरून आज राज्य सरकार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देत आहे. जवळपास 22 राज्यात यापूर्वी 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले –

  • राज्य मागासवर्ग आयोगाने दीडशे दिवस अहोरात्र काम करून अहवाल तयार केला.
  • न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग वैध
  • सॅमपल सर्वे न करता इमपिरीकल डेटा गोळा केला
  • हा कायदा कोर्टात टिकेल, यांची खात्री बाळगा
  • अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाच्या अहवालाला मंजूरी देण्यात आली.
  • आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकद लावणार
  • यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या आक्षेपांचा, त्रुटींचा समिती कडून अभ्यास केला गेला
  • मला कोणत्याही एका समाजाचा विचार करता येत नाही.
  • मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा विजय

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading