चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर : चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले.
नगरपंचायतीच्या कै.नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसेच चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरी सत्कारावेळी बोलत होते. या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) २० टक्के अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाने 1 हजार 325 कोटीची तरतूद केली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे. काजू पीकापासून वाईन बनविणे तसेच काजू बी परतावा याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. चंदगड मतदार संघातील जांभरे, तळकट, गोवा रस्त्याचे काम मार्गी करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येत असून वैद्यकीय सुविधांसाठी 1 हजार कोटी निधीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, चंदगड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील तिटवडे येथे धरण बांधणे, प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून 50 हजार रूपयांचे अनुदान देण्याबाबतची कार्यवाही करू असे सांगून, चंदगड भागात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी आवश्यक ते सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
