कृष्णा लेजंडस् संघाला विजेतेपद !!
पुणे : एजीएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ब्राह्मण क्रिकेट लीग स्पर्धेत प्रतिक दिक्षीत याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
प्लॅटिनम स्पोर्ट्स क्लब, वाडे बोल्हाई येथील मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना बियास ब्राव्होज् संघाने २० षटकामध्ये ८ गडी गमावून ११९ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये कर्णधार शशांक जोशी याने ३१ धावांची तर, महेश गुधाते याने नाबाद २४ धावांची खेळी केली. कृष्णा संघाचा गोलंदाज प्रतिक दिक्षीत याने २१ धावात ३ गडी बाद केले. नचिकेत कुलकर्णी याने २० धावात २ गडी बाद करून बियास संघाच्या धावसंख्येला वेसण घातली. हे लक्ष्य कृष्णा लेजंडस् संघाने १२.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. पराग केळकर (३१ धावा), संकेत जोशी (नाबाद २४ धावा), किरण दातार (२३ धावा) आणि वरूण श्रीखंडे (नाबाद १७ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय साकारून विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गिरीष ओक, अमित उमरीकर, आदित्य पाळंदे आणि शंतनु आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजेत्या कृष्णा लेजंड्स संघाला आणि उपविजेत्या बियास ब्राव्होज् संघाला करंडक देण्यात आला. या शिवाय स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू नचिकेत कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट फलंदाज किरण दातार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज संजय इनामदार, ४५ वर्षावरील सर्वोत्कृष्ट फलंदाज भुषण देशपांडे आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिल मांडके तसेच, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक केतन बापट आणि उदयोन्मुख खेळाडू अथर्व कुलकर्णी अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
बियास ब्राव्होज्ः २० षटकात ८ गडी बाद ११९ धावा (शशांक जोशी ३१, महेश गुधाते नाबाद २४, अभिषेक खांबेटे १९, प्रतिक दिक्षीत ३-२१, नचिकेत कुलकर्णी २-२०) पराभूत वि. कृष्णा लेजंडस्ः १२.२ षटकात ४ गडी बाद १२० धावा (पराग केळकर ३१, संकेत जोशी नाबाद २४, किरण दातार २३, वरूण श्रीखंडे नाबाद १७, सिद्धार्थ वैद्य २-३७); सामनावीरः प्रतिक दिक्षीत;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः नचिकेत कुलकर्णी (कृष्णा लिजंड्स, १५१ धावा, ९ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः किरण दातार (कृष्णा लिजंड्स, २५७ धावा);
सर्वोत्कृष्ट फलंदाज (४५ वर्षावरील)ः भुषण देशपांडे (वशिष्ठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन, १४३ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः संजय इनामदार (कृष्णा लिजंड्स, ११ विकेट);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज (४५ वर्षावरील)ः अनिल मांडके (वशिष्ठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन, ८ विकेट);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः केतन बापट (बियास ब्राव्होज्, ५ विकेट);
उदयोन्मुख खेळाडूः अथर्व कुलकर्णी (इंडस सुपरहिरोज्);
