महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आंतरशालेय धावणे, लांब उडी व रिले स्पर्धेचे आयोजन
पुणे : आपले शतक महोत्सवी वर्ष साजऱ्या करणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धावणे, लांब उडी आणि रिले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवार दि. ५ व मंगळवार दि. ६ फेब्रुवारी रोजी गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलच्या अॅथलेटिक्स ट्रॅकवर सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत स्पर्धा होईल. सदर स्पर्धेचे हे १२ वे वर्ष असून ८, १० आणि १२ वयोगटाखालील मुले आणि मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्रीय मंडळाच्या शिक्षण विभाग संचालिका व या स्पर्धेच्या संचालिका नेहा दामले यांनी कळविली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना नेहा दामले म्हणाल्या की, “मैदानी खेळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. हेच लक्षात घेत मुलांना मैदानात आणण्याच्या हेतू सोबतच त्यांच्यामधील क्रीडासंबंधित क्षमतांची माहिती योग्य वेळी पालकांना व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी तब्बल ५० हून अधिक शाळांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे ज्यामध्ये मुलींची संख्या ही लक्षणीय आहे. या स्पर्धेमध्ये धावणे, रिले आणि लांब उडी अशा तिन क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी कॉसमॉस बँकेचे संचालक अजित गिजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होईल.”
८ वय वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ४ बाय ५० मीटर रिले, धावणे आणि लांब उडी, १० वय वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ४ बाय ८० मीटर रिले, धावणे आणि लांब उडी तर १२ वय वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ४ बाय १०० मीटर रिले, धावणे आणि लांब उडी असे स्पर्धेचे स्वरूप असून विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तर विजेत्या संघाला स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावर्षीच्या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला एक सॅक आणि खाऊचे फूड पॅकेटस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी स्पर्धेसाठी कॉसमॉस बँकेचे विशेष सहकार्य लाभले आहे, अशी माहितीही दामले यांनी दिली.
